Kalyan Dombivli Water Cut Update: पाऊस पडेपर्यंत बारवी धरणात पुरेशा प्रमाणात पाणी साठा असावा, हा दूरदृष्टीने विचार करून शासन निर्देशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेने येत्या आठवड्यापासून दर सोमवार, मंगळवारी कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पालिकेची कल्याण डोंबिवलीतील सर्व उदंचन, जलशुध्दीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर यांनी दिली.

बारवी धरणातून कल्याण डोंबिवली शहरांना दररोज ३४७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. एमआयडीसीकडून डोंबिवली एमआयडीसी आणि परिसरातील निवासी, २७ गाव परिक्षेत्राला ११० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात या भागाला ६० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत असल्याची ग्रामस्थांची माहिती आहे. यावेळी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस सुरू होण्याचा कालावधी लांबण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पाऊस कधी सुरू होईल याची निश्चिती नसल्याने शासनाने धरण क्षेत्रातील सर्व महापालिका, प्राधिकरणांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्देशाप्रमाणे जलसंपदा विभागाने महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर प्राधिकरणांच्या एकत्रित बैठका घेतल्या. या बैठकांप्रमाणे पाऊस सुरू होईपर्यंत आपल्या अधिकार क्षेत्रात कोठेही पाणी टंचाई निर्माण होऊ नये यादृष्टिने आपल्या हद्दीतील जलस्त्रोतांमधील पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने येत्या आठवड्यात सोमवारी, ११ मे रोजी रात्री १२ ते मंगळवारी १२ मे रोजी रात्री १२ या २४ तासाच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पाणी पुरवठा बंदच्या काळात कल्याण डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणारी उदंचन केंद्रे, बारावे, नेतिवली, मोहिली, टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

या बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशा प्रमाणात घरात पाणी साठा करावा, अशी सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. अलीकडे पावसाच्या आगमनाची अनिश्चितता वाढत चालल्याने मागील आठ वर्षापासून शासन पाऊस पडेपर्यंत स्थानिक पालिका, प्राधिकरणांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होईल यादृष्टीने जलस्त्रोतांमधील पाणी साठ्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देत आहे.