कल्याण – कल्याण डोंबिवली शहराच्या अनेक भागात तीव्र पाणी टंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी पालिकेवर मोर्चे आणावे लागत आहेत. टँकर लाॅबीमुळे ही पाणी टंचाई शहरात निर्माण होत आहे. या टँकर लाॅबीला आवर घालण्याची मागणी महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. पाण्याच्या टँकरवर पालिका दरवर्षी ११ कोटीहून अधिक खर्च करते. मग, हे पाणी जाते कोठे, असे प्रश्न करून सर्व पक्षीय नगरसेवकांनी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याचे लेखा परिक्षण करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली.
कल्याण, डोंबिवली शहराच्या काही भागात मुबलक पाणी तर काही भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे नागरिकांना पालिकेवर मोर्चे काढावे लागत आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत असताना ही पाणी टंचाई कशामुळे निर्माण होते याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. शहरात खासगी, पालिकेचे पाणी पुरवठा करणारे टँकर धावत असतात. या टँकर लाॅबीमुळेही या पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा होण्यासाठी ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असण्याचा संशय नगरसेवकांनी महासभेतील चर्चेच्यावेळी व्यक्त केला.
पाण्याचे टँकर
पालिकेकडून पाण्याची टंचाई असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो. या टँकरवर पाणी पुरवठा विभागाचे खरच नियंत्रण आहे का. हे टँकर कोणत्या भागाला कधी पाणी पुरवठा करतात याची माहिती घेण्याची वेळ आली आहे, असे नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी सांगितले. दरवर्षी या पाणी टँकरवर प्रशासन ११ कोटी ५० लाख रूपये खर्च करते. हे टँकर कोणत्या भागात पाणी पुरवठा करतात. त्यांनी वर्षभरात कोणत्या भागाला पाणी पुरवठा केला याचे लेखापरिक्षण होणे आवश्यक आहे, असे नगरसेवक राणे यांनी सांगितले.
नागरिक पाण्याची देयके भरण्यासाठी इच्छुक असतात, पण वर्षभरात पाण्याची देयके नागरिकांना पालिकेकडून पाठवली जात नाहीत. ही देयके मिळावीत म्हणून काही सोसायटी पदाधिकारी, नागरिक पालिकेत फेऱ्या मारतात. त्यांनाही पाणी देयके तयार झाली की पाठवू अशी उत्तरे दिली जातात, असे नगरसेवक विशू पेडणेकर यांनी महासभेत सांगितले.
धरणासाठी पाठपुरावा
कल्याण डोंबिवली शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे पाण्याची वाढती गरज ओळखून भविष्यकालीन पाण्याची गरज ओळखून कल्याण डोंबिवली शहरासाठी स्वतंत्र पाण्याची गरज म्हणून कुशीवली, पोशीर धरणातून कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा होण्यासाठी आतापासून शासनस्तरावर पाठपुरावा होणे गरजेचे आहे, असे ठाकरे गटाचे नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी महासभेत सांगितले. नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्राची आहे त्या जागेत अत्याधुनिक पध्दतीने क्षमता वाढविला तर पाणी प्रश्न सुटेल असे सांगितले.
उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक राणे यांनी पालिकेचा पाण्याचा कोटा वाढून घेण्यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करू. स्वतंत्र धरणासाठी एक प्रस्ताव मंजूर करून ते धरण अंमलात येण्यासाठी निधीसाठी प्रयत्न करू, असे सभागृहात सांगितले. डी-४ वर्गातील अनधिकृत बांधकामांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या जोडण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी नगरसेवक ॲड. मंदार टावरे यांनी महासभेत केली. या जोडण्या मंजूर होत नसल्याने काही रहिवासी आपल्या पाणी जोडणीवरून अनधिकृत बांधकाम राहणाऱ्या रहिवाशांना पाणी विक्री करून आपला व्यवसाय करत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी डी-४ पाणी जोडणी सुरू करा, असे ॲड. टावरे यांनी सांगितले.
