कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेचे मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्र उल्हास नदीच्या काठी आहे. या जलशुध्दीकरण केंद्राच्या १०० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्रात सोमवारी सकाळी उल्हास नदीचे पुराचे पाणी घुसले. या केंद्रातील पाणी उपसा, पुरवठा पंप बंद करण्यात आले. हे केंद्र बंद करण्यात आल्याने टिटवाळा, शहाड, आंबिवली परिसराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

मोहिली येथील उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रात एकूण १६ पंप २४ तास कार्यरत असतात. या पंपांच्या साहाय्याने कल्याण, डोंबिवली शहरांना दररोज पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होतो. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पुराचे पाणी सोमवारी सकाळी १०० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्रात घुसले. या केंद्रात काही तांत्रिक बिघाड होण्यापूर्वीच उपस्थित कामगारांनी वरिष्ठांना माहिती देऊन हे केंद्र तातडीने बंद केले. हे केंद्र बंद केल्याने टिटवाळा, मांडा, शहाड, मोहने, आंबिवली परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मुसळधार पाऊस सुरूच राहून उल्हास नदीची पाण्याची पातळी आणखी वाढत राहिली तर मोहिली येथील संपूर्ण उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्र जलमय होण्याची भीती या केंद्रांचे नियंत्रक ठेकेदार संजय शहा यांनी व्यक्त केली.

स्वयंचलित यंत्रणा

मोहिली उंदचन केंद्रात उल्हास नदीचे पाणी घुसले आणि संपूर्ण केंद्र बंद झाले तर तेथे स्थापित पध्दतीने कामगारांना नियंत्रणाचे काम करता येत नाही. त्यामुळे यापूर्वी तळघरात असलेले हे पंप दरवर्षी येणाऱ्या पूर परिस्थितीमुळे पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी उंचीवर स्थापित करण्यात आले आहेत. तरीही या पातळीपर्यंत पाणी येऊन केंद्र जलमय होते. हे टाळण्यासाठी मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात स्वयंचलित पध्दतीची यंत्रणा कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने बसवून घेतली आहे.

जलशुध्दीकरण केंद्रातील सर्व यांत्रिक यंत्रणा ठेकेदार घर बसल्या दूरसंवेदन यंत्रणेने हाताळू शकतो. यामुळे पूर परिस्थितीत या केंद्रात मनुष्यबळ नसले तरी स्वयंचलित पध्दतीने ही यंत्रणा सुरू करणे, बंद करणे याप्रक्रिया पार पाडता येतात, असे ठेकेदार संजय शहा यांनी सांगितले.

पुराचा अंदाज घेऊन याठिकाणी कार्यरत कामगारांना पुरेसा किराणा, अत्यावश्यक वस्तुंची उपलब्धता करून देण्यात येते. केंद्र पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली की तत्पूर्वीच केंद्र सोडण्याच्या सूचना कामगारांना केल्या जातात. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर जलशुध्दीकरण केंद्रात गाळ आलेला असतो. हा गाळ काढेपर्यंत या यंत्रणा स्वयंचलित पध्दतीने हाताळण्याची सुविधा केंद्रात आहे, असे शहा यांनी सांगितले.

पाणी अधिकारी गायब

कल्याण डोंबिवली पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांना संपर्क केला की त्यांच्या मोबाईलमधून इनकमिंग बंद असा संदेश येत राहतो. पालिका हद्दीतील नागरिक, नगरसेवकांना हा अनभ येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत कार्यकारी अभियंता डावरे यांना नागरिकांनी संपर्क केला तरी हा फोन चुकीचा आहे, असे उत्तर समोरील व्यक्तीकडून देण्यात येते. त्यामुळे आयुक्त अभिनव गोयल यांनी डावरे यांना फोन सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना करण्याची मागणी नगरसेवक, नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नोकरीची अख्खी वर्ष नगररचना विभागाच्या खोलीत घालविल्याने नागरिकांच्या समस्यांविषयी फार कळवळा नसल्याने ते अशी कृती करत असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात आहे. आयुक्तांनी नगररचना विभागातील सर्वच अभियंत्यांना मलनिस्सारण, जलनिस्सारण, पाणी पुरवठा विभागात बदली करण्याची मागणी नगरसेवकांकडून जोर धरत आहे. नगररचना विभागातील बहुतांशी अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, शासन चौकशा, न्यायालयीन प्रकरणांमुळे कारवाईची टांगती तलावर आहे.