कल्याण – कल्याण पश्चिमेतील दूधनाका भागातील सन्मित्र सहकारी मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त केदारनाथ मंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांची पार्श्वभूमी, मंदिराची रचना आणि गणरायाची प्रतिष्ठापना यांमुळे हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

केदारनाथच्या पवित्र वातावरणाची अनुभूती देण्यासाठी देखाव्यात पर्वतरांगा, ढग आणि मंदिराची प्रतिकृती यांचा सुरेख मिलाप साधण्यात आला आहे. मंद प्रकाश योजनेमुळे देखाव्याला भक्तिमय वातावरण प्राप्त झाले आहे. हिमालयाच्या कुशीत विराजमान असलेल्या गणरायाचे रूप भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

या मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये त्याची वैशिष्ट्यपूर्ण शिखर रचना, प्रवेशद्वार आणि सभोवतालचा पर्वतीय परिसर यांचे कलात्मक चित्रण करण्यात आले आहे. विविध सजावटीचे साहित्य, रंगकाम आणि प्रकाशयोजनेचा कल्पक वापर करून हा देखावा साकारण्यात आला आहे.

या देखाव्याची सजावट सारंग केळकर यांनी केली आहे. त्यांच्या कलात्मक संकल्पनेतून आणि परिश्रमातून केदारनाथच्या मंदिराचे देखणे रूप साकारले आहे. मंडळाचे अध्यक्ष वैभव हरदास यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी देखाव्यासाठी सहकार्य केले आहे.