Kalyan Durgadi Fort Shivsena Andolan: बकरी ईदच्या दिवशी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्यावरील ईदगाहसमोर मुस्लिम समुदायाकडून नमाज अदा केला जातो. यावेळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरातील हिंदू भाविकांचे दर्शन बंद ठेवले जाते. या कालावधीत मंदिरातील घंटा जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून पोलिसांकडून दोरीने बांधून ठेवली जाते. नमाज अदा केला जात असताना या कालावधीत मंदिरात हिंदू भाविकांना दर्शनासाठी प्रवेश असावा, हिंदू भाविकांवरील निर्बंध हटविण्यात यावेत या मागणीसाठी गुरूवारी सकाळी कल्याण पश्चिमेतील लालचौकी येथे दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारापासून काही अंतरावर शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि हिंदू धर्म संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घंटानाद आंदोलन केले.
मागील ४० वर्षापासून शिवसेनेकडून या मागणीसाठी कल्याणमध्ये बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशव्दारावरील रस्त्यावर आंदोलन केले जाते. या कालावधीत मुस्लिम समुदायाकडून नमाज अदा केला जात असतानाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त लालचौकी येथील आंदोलन आणि दुर्गाडी किल्ला परिसरात तैनात केला जातो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या पुढाकाराने या आंदोलनाला सुरूवात झाली. आनंद दिघे यांच्या निधनानंतर तत्कालीन जिल्हाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. आजही हिंदू भाविकांच्या हक्कासाठी शिवसैनिक बकरी ईदच्या दिवशी कल्याणमध्ये हे आंदोलन करतात. कल्याण, डोंबिवली शहर परिसरासह मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरातील शिवसैनिक या आंदोलनात सहभागी होतात.
दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लिम समुदायाकडून होणारे नमाज पठण, या कालावधीत किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरातील हिंदू भाविकांचे दर्शन बंद यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढला जातो. नमाज पठण शांततेत पार पडावे आणि नमाज अदा केल्यानंतर तात्काळ हिंदू भाविकांना दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात हिंदू भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्याची कार्यवाही पोलिसांकडून तात्काळ पार पाडली जाते.
लालचौकी येथे आंदोलन
गुरूवारी सकाळी शिवाजी चौकात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमून पायी लालचौकी येथे आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी लालचौकी येथे लावलेले अडथळे ओलांडून दुर्गाडी किल्ला दिशेने जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी तेथेच रोखले. एकही शिवसैनिक नमाज अदा होण्याच्या काळात दुर्गाडी दिशेने जाणार नाही याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती.
दुर्गाडी किल्ला आमच्या हक्काचा…घोषणांनी लालचौकी परिसर दणाणून गेला होता. दुर्गाडी किल्ल्याकडून कल्याणमध्ये येणारी आणि कल्याण शहरातून दुर्गाडी किल्लाकडे जाणारी वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात आली होती. शुभ्रधवल कुर्ता, सदरा आणि भगव्या टोप्यांनी परिसर गजबजून गेला होता.
शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, हिंदू धर्म संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. काही शिवसैनिक पोलिसांच्या उंच अडथळ्यांवर चढून तेथून उडी मारून दुर्गाडी किल्ला दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना पोलिसांनी रोखून धरले. आक्रमक शिवसैनिक घटनास्थळावरून हलत नसल्याने अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांसह शिवसैनिकांना ताब्यात घेतले. त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी नेले.
काही आक्रमक शिवसैनिकांच्या घरावर पोलिसांनी बकरी ईदच्या दिवशीचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी रात्रीपासून पाळत ठेवली होती. काही शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटिसा देण्यात आल्या होत्या. ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांवर प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केला म्हणून पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो.अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ आणि पोलीस कर्मचारी याठिकाणी बंदोबस्तावर होते.
