कल्याण – रमजान आणि नवरात्रोत्सव सण एकाच वेळी आले. त्यावेळी काही वर्षापूर्वी दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे मंदिर हिंदू भाविकांना खुले ठेऊन, पायथ्याशी इदगाह समोर मुस्लिम समुदायाने नमाज पठण केले होते. सुरळीतपणे हे सर्व पार पडले होते. हीच प्रथा यापुढे चालू ठेवणे आवश्यक होते. पण, बकरी ईदच्या दिवशीच्या मंदिर बंद ठेवणे हा विषय कोणालाच मार्गी लावणे पसंत नाही. म्हणून हा विषय चिघळत ठेवण्यात आला आहे. राज्यात भाजपचे हिंदुत्ववादी सरकार आहे. याच सरकारच्या काळात नमाज पठणाच्यावेळी दुर्गाडी येथील मंदिर बंद ठेवण्यात येत असेल तर ते लांच्छानास्पद आहे. भाजपचे हिंदुत्वच बेगडी आहे. त्यामुळे हे असे होत, असा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी गुरूवारी दुर्गाडी प्रवेशव्दारावरील घंटानाद आंदोलनाच्यावेळी माध्यमांशी बोलताना केला.

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिर बंद ठेवण्याची प्रथा बंद करावी म्हणून आपण तीन दिवसापूर्वी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठविले होते. त्या पत्राचे साधे उत्तर देण्याचे सौजन्य मुख्यमंत्र्यांनी दाखवले नाही. हिंदुत्ववादाचा टेंभा मिरवत ‘हे’ मते मिळवतात. हिंदुत्वाचे कार्ड सोबत ठेऊन सत्तेत येतात. विधीमंडळासारखे हक्काचे व्यासपीठ सत्ताधाऱ्यांना आहे. अशा परिस्थितीत तेथे असे वादाचे विषय मांडून ते मार्गी लावण्यात कोणालाही रस नाही, असेच दिसते. त्यामुळे हिंदु भाविकांना अशी आंदोलने करावी लागत आहेत हे दुर्देवी आहे, असे उपनेते साळवी यांनी सांगितले.

गुरूवारी यांचे एक लोकप्रतिनिधी उत्साहाने घंटानाद आंदोलनात सहभागी झाले. त्यांची तळमळ लक्षात घेतली तरी त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची माळ वाजून मोठा आनंदोत्सव साजरा केला. ज्यांना घंटानाद आंदोलन हे हिंदूंच्या हक्कासाठी सुरू आहे. तेथे आपणास न्याय मिळत नाही म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे हे माहित नाही. याच्या सारखे दुर्देव नाही. याऊलट काळे झेंडे घेऊन या आंदोलनात सहभागी होण्याऐवजी हे लोक फटाके फोडत असतील तर यांचा आंदोलनातील सहभाग आणि त्यांची आंदोलनाविषयीची विचार शक्तीही यामाध्यमातून प्रकट होते, अशी बोचरी टीका साळवी यांनी केली.

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर नमाजाच्या दिवशी दुर्गादेवी मंदिर शासनाकडून बंद करण्यात येऊ लागले. त्या ४० वर्षापासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर खुले करण्यासाठी लढा सुरू झाला. या लढयातून यशस्वी मार्ग काढण्याची कोणाचीही इच्छाशक्ती नाही. त्यामुळे किती सरकारे आली आणि गेली. कोणालाही या महत्वाच्या विषयी पडलेले नाही. राज्य घटनेच्या २३ व्या कलमाप्रमाणे एखाद्या समाजाला तुम्ही न्याय देत असाल तर दुसऱ्या समाजावरही त्यावेळी अन्याय होता कामा नये अशी तरतूद आहे. दुर्गाडी प्रकरणात तेच दिसून येते. एकीकडे नमाज सुरू आणि दुसरीकडे मंदिर बंद. त्यामुळे पुढील वर्षी उच्च न्यायालयात याप्रकरणी आम्ही दावा करून नक्कीच यश मिळवू, असा विश्वास उपनेते साळवी यांनी व्यक्त केला.

आनंद दिघे यांच्या साथीने या आंदोलनातील सहभागी एकनाथ शिंदे आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. त्यांनाही हा महत्वपूर्ण विषय चर्चेला घेऊन मार्गी लावावा असे वाटत नाही. राज्यात भाजपचे सरकार असताना मंदिर सुरू ठेवावे म्हणून हिंदू भाविकांना आंदोलन करावे लागते यासारखे दुर्देव नाही. भाजपच्या बेगडी राजकारणामुळे ही परिस्थिती ओढावली आहे, अशी खंत साळवी यांनी व्यक्त केली.