कल्याण : कल्याण पूर्वेतील आशेळे भागात काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पालिका अधिकाऱ्यांना निवेदने देऊनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी मंगळवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. आशेळे परिसरात मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. गेल्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, सागर्ली परिसरातील पाणी टंचाईवरून भाजपने पालिकेवर मोर्चा काढला होता.

पालिकेत शिंदे शिवसेना, भाजपची सत्ता असताना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना पालिकेवर मोर्चे काढावे लागत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा पालिका प्रशासनावर वचक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहेत. रिकामी नळ आता चालणार नाही. आशेळे भागाल सुरळीत पाणी पुरवठा झालाच पाहिजे. आता आम्हाला आश्वासन नको, अशी ठाण भूमिका मोर्चेकरांनी घेतली.

पाणी मिळणे हा आमचा हक्क आहे, असे फलक व घोषणाबाजी करून आशेळे परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नगरसेविका कीर्ती ढोणे, विभाग प्रमुख शुभम ढोणे यांनी मुबलक पाणीपुरवठ्याचे आश्वासन मिळाल्याशिवाय पालिकेसमोरून न हटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोर्चेकरी अधिक आक्रमक झाले. महिला, पुरुष रिकामे हांडे, बादल्या, घागरी हातात घेऊन पालिका मुख्यालया समोर घोषणाबाजी केली.

स्थानिक अधिकाऱ्यांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्या दालनाबाहेर नगरसेविका कीर्ती ढोणे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध नोंदवला. मुबलक पाणी आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या ठिय्या आंदोलनात नगरसेवक राहुल कोट, निलेश खंबायत, अपर्णा भोईर, तेजश्री गायकवाड, विशाल गारवे ,स्वप्नाली केणे, वंदना महिले, गटनेते उमेश बोरगावकर, विभाग प्रमुख शुभम ढोणे हे पदाधिकारी सहभागी झाले होते. आशाळे पाड्यातील नागरिकांना अनेक महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे.

पूर्वी आठवड्यातून चार वेळा पाणी पुरवठा होत होता. आता पाणी नसल्यामुळे नागरिकांचे खूप हाल होतात. स्थानिक रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका कीर्ती ढोणे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांनी पाणीपुरवठा विभाग या समस्येबाबत अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करून देखील यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही.महापालिका प्रशासनाने नगरसेविका ॲड. कीर्ती ढोणे यांना मुबलक पाणी पुरवठ्याचे लेखी आश्वासन देण्याची हमी दिल्यानंतर नगरसेवकांकडून ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

अनेक दिवसांपासून आशेळे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून आम्ही आज शेकडो रहिवाशांसह महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला आहे. मुबलक पाण्याचा आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.-ॲड. कीर्ती ढोणे नगरसेविका.