कल्याण – कल्याण पूर्वेत मलंगगड नेवाळी रस्ता, नांदिवली तर्फ परिसरात रस्ते, पदपथ अडवून फेरीवाले व्यवसाय करत आहेत. त्यामुळे या भागात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होत होती. याविषयीच्या वाढत्या तक्रारी प्राप्त झाल्याने पालिकेच्या ‘आय’ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दोन दिवसापूर्वी या फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त केले.
या कारवाईमुळे या रस्त्याने नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालक, प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. कल्याण पूर्व भागात चाळी, झोपडपट्टी भाग सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागातील रस्ते, गल्लीबोळ, पदपथ, मुख्य वर्दळीचे रस्ते अडवून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फेरीवाले व्यवसाय करतात. भाजीपाला, फळे विक्री, घरगुती वस्तुंची विक्री फेरीवाले करतात. या फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होत होती. पादचाऱ्यांना चालणे या भागातून मुश्किल झाले होते. कल्याण पूर्व भागातून मलंगगड रस्त्याने अनेक वाहन चालक नेवाळी मार्गे बदलापूर, अंबरनाथ काही वाहन चालक काटई, तळोजा रस्त्याने जातात. या वाहनांना या फेरीवाल्यांचा अडथळा येत होता.
आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्याकडे या फेरीवाल्यांसंदर्भात वाढत्या तक्रारी येऊ लागल्या. या अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी नांदिवली तर्फ, आरटीओ तपासणी केंद्र, नांदिवली तलाव, मलंगगड रस्ता परिसराची पाहणी केली. त्यावेळी बहुतांशी फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करत असल्याचे आणि यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आले. या पाहणीनंतर दुसऱ्याच दिवशी साहाय्यक आयुक्त जगताप, अधीक्षक साळुंखे, पथकप्रमुख विजय रसाळकर यांनी फेरीवाला हटाव पथक सोबत घेऊन अचानक मलंग रस्ता भागातील फेरीवाल्यांवर कारवाई केली.
अचानक कारवाई सुरू होताच फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. कारवाई पथकाने फेरीवाल्यांच्या भाजीपाल्यासह हातगाड्या जप्त केल्या. साहाय्यक आयुक्त जगताप, अधीक्षक साळुंखे यांनी पळणाऱ्या फेरीवाल्यांना रोखून धरले. पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या सर्व फेरीवाल्यांचे सामान पथकाने जप्त केले. पदपथ अडवून उभारलेले निवारे यावेळी जमीनदोस्त करण्यात आले.
टिटवाळ्यात थंडावा
अ प्रभाग टिटवाळा भागात फेरीवाल्यांनी थैमान घातले आहे. बेसुमार बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. याविषयी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी फक्त कारवाईचे आश्वासन नागरिकांना देऊन प्रत्यक्ष कारवाई करत नसल्याने स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
आयुक्त अभिनव गोयल यांनी टिटवाळा परिसरातील फेरीवाले आणि बेकायदा बांधकामांची माहिती घेऊन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. त्यांच्या वाहनाचा खासगी वाहन चालक फेरीवाले, भूमाफियांशी संधान साधत असल्याची एक दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत गेल्या महिन्यात प्रसारित झाली होती. याविषयीही आयुक्त, समपदस्थ नियंत्रक अधिकाऱ्यांनी साहाय्यक आयुक्त चौधरी यांच्यावर कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अ प्रभागातील बहुतांशी साहाय्यक आयुक्त बेकायदा चाळींच्या विषयांवरून निलंबित होण्याची परंपरा आहे.

