कल्याण – कल्याण पूर्व नांदिवली भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर मागील अनेक महिने सुरू असलेला आठवडी बाजार शुक्रवारी पालिकेच्या आय प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने कारवाई करून हटवला. या बाजारातील २०० फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ते, पदपथ अडवून लावलेला सुमारे आठ लाख रूपयांचा माल यावेळी कारवाई पथकाने जप्त केला.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील आठवडी बाजारांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत. तसेच, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनीही आठवडी बाजारामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. वाहन कोंडीच्या समस्या निर्माण होत असल्याने हे बेकायदा बाजार बंद करण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
या आदेशाप्रमाणे शुक्रवारी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त डाॅ. सुनील लोखंडे, अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागात भरणारा आठवडी बाजारावर कारवाई करण्याचे नियोजन केले. दुपारी तीन वाजल्यापासून बाजाराच्या ठिकाणी माल लावण्यासाठी फेरीवाल्यांची वर्दळ वाढली. त्यांची वाहने या भागात रस्ते अडवून उभी करण्यात येत होती. या बाजारावर कारवाई होणार नाही असे फेरीवाल्यांना वाटत होते.
संध्याकाळी सहा वाजता या बाजाराच्या आयोजकांना कोणतीही चाहूल लागू न देता ‘आय’ प्रभागाचे अधिकारी डाॅ. लोंढे, साळुंखे आपली कारवाई पथके घेऊन नांदिवली तर्फ बाजारात पोहचले. त्यांनी पहिले चारही बाजुने बाजाराला घेरले. एकही फेरीवाला बाजारातून पळून जाणार नाही याची खबरदारी घेत बाजारातील फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्याची कार्यवाही सुरू केली.
फेरीवाला पथकाने बाजारात अचानक कारवाई सुरू करताच फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. पथकांनी मिळेल ते सामान घेऊन ते कारवाई पथकाच्या वाहनात कोंबले. कारवाईत साळुंखे स्वता सहभागी होऊन माल जप्त करत होते. या कारवाईत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यांना मध्ये न येण्याच्या आणि आक्रमक भूमिका घेतली तर गुन्हा दाखल करण्याची तंबी अधीक्षक साळुंखे देत होते. कारवाईच्या भीतीने अनेक फेरीवाल्यांनी बाजारात सामान टाकून पळ काढला. या बाजारात सुमारे २०० फेरीवाले होते.
चारही बाजुने एकावेळी पालिकेच्या कामगारांनी कारवाई सुरू केल्याने फेरीवाल्यांची कोंडी झाली. अनेक महिने या भागात हा बाजार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
या बाजाराच्या माध्यमातून काही स्थानिक जमीन मालक, माफिया फेरीवाल्यांकडून जागा भाड्याने देतो सांगून पैसे वसूल करत होते, अशा तक्रारी आहेत. या बाजाराच्या माध्यमातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नव्हता. कल्याण पूर्व आय प्रभाग हद्दीतील बहुतांशी आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. हा बाजार पुन्हा भरणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेतील रुणवाल गार्डन, डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील बेकायदा बाजार बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. आता ह प्रभागात जगदांबा माता मंदिर भागातील अनेक महिने बंद असलेला आठवडी बाजार पुन्हा या आठवड्यापासून सुरू करण्यास काही स्थानिकांनी सुरूवात केल्याची चर्चा आहे.
तसेच, डोंबिवली एमआयडीसीतील डोंबिवली जीमखाना ते सागर्ली भागातील मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार पालिकेने सर्व प्रभागांचे कामगार एकत्रित आणून संयुक्तिक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा आठवडी बाजार मागील अनेक वर्ष वाहतुकीला अडथळा ठरत आहे.
