कल्याण : कल्याण पूर्व भागात काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. पूर्व सूचना न देता महावितरणचा वीजपुरवठा पाच ते नऊ तास अचानक खंडित होत असल्याने सर्व व्यवहार ठप्प होत आहेत. विजेच्या सततच्या लपंडावामुळे कल्याण पूर्व भागात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून महावितरणने याबाबत तत्काळ पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी दिला.
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक त्रस्त झाले आहेत. दिवसाढवळ्या घरात अंधार पसरत असल्याने मेणबत्ती लावून घरातील व्यवहार करावे लागतात. व्यापारी, खासगी आस्थापनांमधील व्यवहार ठप्प होत आहेत. मुलांना घरात अभ्यास करताना अडचणी येत आहेत. घरगुती व्यवसाय बंद राहत असल्याने छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कल्याण पूर्व भागातील महावितरणविरोधात वारंवार तक्रारी आल्याने भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी मंगळवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारून, या समस्येवर तत्काळ उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या पुढाकाराने आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या बैठकीत महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आहीर, कनिष्ठ अभियंता नायरे, लाईनमन काळे उपस्थित होते. यावेळी मलंग रोड, अमरदीप व पिसवली भागातील सर्व रोहित्रे आणि त्यांच्यावरील विद्युत भाराबाबत सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली.
वीज भाराच्या विभागणीसाठी प्रत्यक्षात काम सुरू करणार
- कल्याण पूर्व विजयनगर, चिंचपाडा, काटेमानिवली, खडेगोळवली भागातील रहिवासी सततच्या खंडित वीज पुरवठ्याने त्रस्त आहेत. याबाबत झालेल्या बैठकीत एकाच रोहित्रावर असणारा परिसरातील अतिरिक्त वीजभार विभागून देण्यात येईल, यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण थांबेल.
- वीज भाराची योग्य विभागणी झाल्यामुळे परिसरातील सर्व ग्राहकांना अखंडित आणि योग्य दाबाने वीज पुरवठा मिळेल, नवीन साहित्याची मंजुरी, वीज भाराच्या विभागणीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या विद्युत सामग्रीला तत्काळ मंजुरी घेऊन प्रत्यक्षात काम सुरू करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवक भोईर यांना दिले.
- महावितरणने दिलेल्या आश्वासनानुसार वीज भार विभागणीचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना या त्रासातून लवकरात लवकर मुक्त करावे, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपचे नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी दिला आहे.
