कल्याण – कल्याण पूर्व भागात मागील काही दिवसांपासून दररोज पाच ते नऊ तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. विजयनगर, चिंचपाडा, काटेमानिवली, तिसगाव, कोळसेवाडी भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार अधिक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे विजेवर आधारित रहिवाशांबरोबर लघु उद्योग व्यवसाय चालक, व्यापारी, घाऊक विक्रेते, गोदाम चालक, आस्थापना मालक त्रस्त आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क केला की तासन तास ग्राहक सेवा संपर्क क्रमांक व्यस्त लागतो. चुकून हा क्रमांक लागला आणि समोरील कर्मचाऱ्याने प्रतिसाद दिला तर प्रथम तो तुमचा वीज देयक क्रमांक द्या, तुमचे नाव, तुमचा पत्ता, परिसर नाव लिहून घेतो. अशाप्रकारच्या तक्रारी करूनही वेळेत वीज पुरवठा सुरू होत नाही, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

संध्याकाळच्या वेळेत, मध्यरात्री, दिवसातून केव्हाही वीज पुरवठा खंडित होत आहे. महावितरणने हा सततचा खंडित वीज पुरवठ्याचा प्रकार लवकरात लवकर बंद करावा अन्यथा नागरिकांचा भव्य मोर्चा महावितरणच्या कल्याण पश्चिमेतील तेजश्री कार्यालयावर काढण्याचा विचार नागरिक करत आहेत. अनेक पक्षीय संघटना या सततच्या खंडित वीज पुरवठयाने त्रस्त आहेत. आम्ही काही महिन्यापूर्वी महावितरणच्या स्थानिक अभियंत्यांना कल्याण पूर्वेतील विजेचा लपंडाव बंद करा म्हणून पत्रे दिली आहेत. त्याची दखल महावितरणकडून घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच याप्रकरणी महावितरणला जाब विचारण्यासाठी मोर्चाची तयारी करू, असे काही पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्ग, शाळकरी मुलांची घाई असते. सकाळच्या वेळेत घरातील वीज पुरवठा खंडित झाला तर घरातील सर्व व्यवहार ठप्प होतो. संध्याकाळच्या वेळेत वीज पुरवठा खंडित झाला की अभ्यासाला बसलेल्या विद्यार्थ्यांची अडचण, शिकवणी वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांना अंधारात चाचपडत घरी यावे लागते. नोकरदार वर्ग घरी येण्याची वेळ आणि त्यात संध्याकाळी वीज गेली की घरातील व्यवहार ठप्प होतात. व्यापारी, दुकानदार, घाऊक विक्रेते या सर्व प्रकाराने त्रस्त आहेत. अनेक नोकरदार आपले कार्यालयीन काम दिवसभर घरातून करतात. काही नोकरदार परदेशातील कार्यालयीन वेळेप्रमाणे रात्रीच्या वेळेत काम करतात. या दोन्ही वेळेत काम करणाऱ्या नोकरदारांची वीज पुरवठा खंडित झाला की कार्यालयीन काम करताना मोठी अडचण होत आहे, असे रहिवासी, व्यापाऱ्यांनी सांगितले.

झाड छाटणीकडे दुर्लक्ष

पावसाळ्यापूर्वी महावितरणने वीज वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून टाकल्या असत्या तर आता या फांद्या वीज वाहक तारांवर पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले नसते. मुसळधार पाऊस सुरू असताना अनेक ठिकाणी झाडे विजेच्या खांबावर पडत आहेत. फांद्या वीज वाहक तारांवर वेळीअवेळी पडत आहेत. पालिका आणि महावितरणने संयुक्तपणे ही झाड छाटणी मोहीम पावसाळ्यापूर्वी राबविणे आवश्यक होते, असे नागरिकांनी सांगितले.

खोदकामाचे फटके

महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले, कल्याण पूर्व भागात रस्ते कामे करताना अनेक ठिकाणी खोदकामे करण्यात आली. ही खोदकाम करताना भूमिगत वीज वाहक वाहिन्या जेसीबीच्या टोकाने तुटल्या आहेत. या वाहिन्या दुरूस्त करूनही त्यात आता पावसाचे पाणी जाऊन त्या नादुरुस्त होऊन वीज प्रवाह खंडित होत आहे. रस्ते खोदकाम करताना ठेकेदाराने कधीही महावितरणला त्याची माहिती दिली नाही. अन्यथा हे प्रकार घडले नसते. खोदकाम करणाऱ्या सेवा वाहिन्यांचे ठेकेदार या सर्व प्रकाराला जबाबदार आहेत. काही विशिष्ट भागातील तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित आहे.