कल्याण – कल्याण पूर्व भागातून दररोज शेकडो नागरिक रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवास करतात. अनेक ज्येष्ठ नागरिक, वृध्द, दिव्यांग, विविध व्याधीग्रस्त याच मार्गाने रेल्वे स्थानक ते कल्याण पूर्व प्रवास करतात. कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळ सरकता जिना, उदवाहन नसल्याने दररोज प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीचा विचार करून कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायवाॅकलगत सरकता जिना, उदवाहन उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानकालगत प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने, उदवाहन आहे. मग कल्याण पूर्व भागात ही सुविधा का नाही. कल्याण पूर्व भागातून शेकडो प्रवासी दररोज येजा करतात. अनेक प्रवासी ज्येष्ठ नागरिक, वृध्द, व्याधीग्रस्त, दिव्यांंग असतात. त्यांना स्कायवाॅकचे अवघडलेले जिने चढून रेल्वे स्थानकात जाणे शक्य नसते. त्यामुळे अशा प्रवाशांची रेल्वे स्थानकात जाताना किंवा कल्याण पश्चिमेत जाताना दमछाक होते. यासाठी कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात सरकता जिना आणि दिव्यांचा विचार करून उदवाहनाची उभारणी करावी म्हणून मागील दीड वर्षापासून कल्याण पूर्व भागातील सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम कल्याण डोंबिवली पालिका, रेल्वे प्रशासनाकडे मागणी करत आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते नितीन निकम यांनी यासंंदर्भात पालिकेकडे या सुविधेसाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत आयुक्त गोयल यांनी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना पत्र लिहून कल्याण पूर्व भागातील स्कायवाॅकलगत नाल्या जवळच्या जागेत पुलाखाली सरकता जिना आणि उदवाहनाची आपण उभारणी करू शकता असे सुचविले आहे. या कामासाठी एकूण सुमारे चार कोटी ६० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.

या संदर्भातच्या विस्तृत आराखड्याची आपण तपासणी करावी आणि हे काम हाती घ्यावे, अशी मागणी आयुक्तांनी रेल्वेकडे केली आहे. कल्याण पूर्वेतून रेल्वे स्थानकातील मुख्य स्कायवाॅकवर येण्यासाठी सुमारे तीनशे ते चारशे मीटर अंतर प्रवाशांना दररोज चालावे लागते. या सगळ्या चालण्यात प्रवाशांची दमछाक होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, वृध्द, व्याधीग्रस्तांचे सर्वाधिक हाल होतात. महिला वर्गांची कुचंबणा होते. त्यामुळे कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात स्कायवाॅक, उदवाहन उपलब्ध करून दिले तर प्रवाशांना होणारा दैनंदिन त्रास कमी होणार आहे, असे आयुक्तांनी रेल्वेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणले आहे.