कल्याण – कल्याण पूर्व भागात दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिक घरातील पाणी उपसून थकले आहेत. या तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या आपत्कालीन पथकांबरोबर संतोषनगर प्रभागाचे नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड भर पावसात आपल्या संतोषनगर प्रभागात कार्यकर्त्यांसह दोन दिवसांपासून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फिरत आहेत. मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व भागात अनेक ठिकाणी कचरामुळे गटारे तुंबली आहेत. काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा खच नाल्याच्या अरूंद भागात येऊन पाणी तुंबून ते वस्तीत घुसले आहे. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आपल्या संतोषनगर प्रभागासह संपर्कप्रमुख महेश गायकवाड कल्याण पूर्वेत फिरत आहेत.

रविवारी सकाळी नगरसेवक महेश गायकवाड यांनी संतोषनगर प्रभाग हद्दीत नाल्यांमध्ये उतरून हातात फावडे घेऊन गटारांमधील कचरा बाहेर काढून नाल्यांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक गायकवाड आणि त्यांचे आठ ते दहा कार्यकर्ते मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा विचार न करता प्रभागात दिवस, रात्र फिरून पावसामुळे नागरी वस्तीत झालेला पाण्याचा निचरा करण्यासाठी फिरत आहेत. मागील अनेक वर्षानंतर प्रथमच एक नगरसेवक हातात फावडा घेऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी फिरत असल्याचे आम्ही पाहत आहोत, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यापूर्वी अशाप्रकारे नगरसेवक कधी फिरताना आम्ही पाहिले नाहीत, असे रहिवासी सांगत होते.

घरात पाणी घुसलेल्या नागरिकांना आवश्यक मदत तातडीने करण्यासाठी नगरसेवक गायकवाड पुढाकार घेत आहेत. काही नागरिकांना भोजनाची व्यवस्था केली जात आहे. काही घरांमध्ये रुग्ण आहेत. त्यांना घरात घुसलेल्या पाण्याचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आवश्यक सहकार्य करत आहेत. रविवारी सकाळी नगरसेवक महेश गायकवाड यांनी स्वता हातात फावडा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह संतोषनगर प्रभागात ज्या भागात पाणी तुंबले आहे त्या भागातील नाल्यांमधील गाळ, कचरा स्वता नाल्यात उतरून बाहेर काढला. ही सफाई केल्यानंतर त्या भागातील पाण्याचा मार्ग मोकळा होत नसल्याने नागरिक समाधान व्यक्त करत होते.

नालेसफाईच्या कामाच्यावेळी ठेकेदाराने नाल्यांची योग्यरितीने सफाई केली आहे की नाही, गटारांची योग्य सफाई केले आही की नाही हे तपासण्यासाठी नगरसेवक महेश गायकवाड थेट नाल्यात उतरून गाळ, कचरा नाल्याच्या पृष्ठभागावर आहे की नाही याची चाचपणी करत होते. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे ठेकेदारांना वचक बसून ते कल्याण पूर्व भागातील नाले, गटारांमध्ये कुठे गाळ, कचरा राहणार नाही याची काळजी घेत आहेत. रविवारी त्याचा प्रत्यय नागरिकांनी स्वता घेतला. रविवारी सकाळपासून नगरसेवक गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह फिरत असल्याने नागरिकांनी आपल्या नागरी समस्यांविषयी, पाणी पुरवठ्याविषयी तक्रारी त्यांना सांगितल्या. या तक्रारींचे लवकरच निराकरण केले जाईल, असे आश्वासन नगरसेवक महेश गायकवाड यांनी रहिवाशांना दिले.