कल्याण – कल्याण पूर्व शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका भागातील रस्ते, पदपथ अडवून सुरू करण्यात आलेला अनेक वर्षांचा मटण विक्री बाजार पालिकेच्या आय प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने जेसीबींच्या साहाय्याने उध्वस्त करून टाकला. या मटण विक्री बाजारामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होत होता. या दुकानांसमोरील ग्राहकांची गर्दी, त्यांची वाहने वाहतुकीला अडथळा आणत होती.

मागील अनेक वर्षापूर्वी मटण विक्रेत्यांनी या भागातील मोकळ्या जागा बळकावून तेथे हातगाड्या गाळे उभारले, रस्ते, पदपथ, चौकातील कोपरे अडवून, पदपथांचा आडोसा घेऊन मटण विक्रीची दुकाने सुरू केली. पिसवली, आडिवली, ढोकळी भागात कष्टकरी, मजूर वर्ग सर्वाधिक राहतो. त्यामुळे हा वर्ग या मटण विक्री बाजारातून मटण विक्री खरेदी करत होता. आय प्रभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना टाटा नाका परिसरात फिरत होते. यावेळी त्यांच्या या भागातील मटण विक्रेत्यांनीही पदपथ, रस्ते, चौक अडवून मटणाची दुकाने थाटली असल्याचे लक्षात आले.

या दुकानदारांना कोणतीही चाहूल लागू न देता गेल्या आठवड्यात अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी अचानक दोन जेसीबी घेऊन टाटा नाका परिसरात आणले अतिक्रमण नियंत्रण, फेरीवाला हटाव पथक घेऊन कारवाईला सुरूवात केली. दुकानदारांनी आपली दुकाने थाटली होती. मटण विक्री दुकाने हटविण्याची कारवाई सुरू होताच दुकानदारांची पळापळ झाली.

अनेक दुकानदारांनी अधीक्षक साळुंखे यांच्याशी वाद घालून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. काहींनी जुन्या कर पावत्या दाखवून दुकाने वाचविण्याचा प्रयत्न केला. काही मटण विक्रेते झुंडीने एकत्र येऊन या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न करत होते. कोळसेवाडी पोलिसांनी अशा सर्व दुकानदारांना बाजुला करून कारवाईत अडथळा येणार नाही यासाठी प्रयत्न केले. काही मटण विक्रेत्यांनी राजकीय मंडळींचे फोन अधीक्षक साळुंखे यांच्यावर दबाव आणले. आपण ही कारवाई रस्ते, पदपथ मुक्त करण्यासाठी आणि नागरिकांना मुक्तपणे चालता यावे म्हणून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे करत आहोत, असे उत्तर साळुंखे यांनी संपर्क करणाऱ्या राजकीय मंडळींना दिले.

तरीही, ही कारवाई थांबवावी अशी गळ काही राजकीय घालत होते. या कारवाईत कोणताही खंड पडणार नाही. ही कारवाई पूर्ण करून मगच आम्ही येथून हलणार असा आक्रमक पवित्रा साळुंखे यांनी घेतला होता. कारवाई पथक टपऱ्या, हातगाड्या, मंच रस्त्यावर आणून जेसीबी खाली घालून त्याचा चुराडा करत होते. मटण विक्रेत्यांची लाखो रूपयांची सामग्री या कारवाईत तोडून टाकण्यात आली.रस्ते, पदपथ अडवून अनेक वर्षाचा मटण विक्री बाजार हटविण्यात आल्याने प्रवाशांनी, वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.