कल्याण – कल्याण पूर्वेत नांदिवली तर्फ भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांचे नियोजन करत असताना निर्माण झालेली वाहतूक कोंडी सोडवत असताना एका मोटारीतील दोन जणांना वाहतूक पोलिसांना वाहन बाजुला घेण्याची सूचना केली. त्याचा राग येऊन या वाहनातील आडिवली ढोकळी, द्वारली गावातील दोन तरूणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली.

देविदास गोपाळ वाघेरे (३८) असे तक्रारदार वाहतूक पोलिसाचे नाव आहे. ते कोळसेवाडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. हवालदार वाघेरे यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी सागर जगन्नाथ साळुंखे (३१, रा. गणेशचाळ, गणेश मंदिराजवळ, व्दारली गाव, कल्याण पूर्व), आतिष मारूदी दहातोंडे (२७, रा. मंगेश पार्क, आडिवली ढोकळी, कल्याण) यांच्या विरूध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार देविदास वाघेरे कल्याण पूर्व भागातील नांदिवली तर्फ भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत होते. या भागात दररोज फेरीवाल्यांचे बाजार भरतात. फेरीवाल्यांनी पदपथ, रस्ते अडवलेले असतात. त्यामुळे या भागात दररोज वाहन कोंडी होते. ही कोंडी सोडविण्याचे काम बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता तक्रारदार वाघेरे करत होते. नांदिवली तर्फ भागातील मुख्य रस्त्यावर वाहन कोंडी झाल्याने वाघेरे प्रत्येक वाहन चालकाला शिस्तीने रांग न मोडता वाहन पुढे नेण्याच्या सूचना करत होते. बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्यांना त्यांनी रोखून धरले होते.

नांदिवली तर्फ भागातील वाहन कोंडी सोडविण्यासाठी गुन्हा दाखल इसम बसलेल्या वाहनातील सागर साळुंखे, आतिष दहातोंडे यांना हवालदार वाघेरे यांनी आपले वाहन बाजुला घ्या आणि इतर वाहनांना पुढे जाऊन द्या, अशी सूचना केली. एवढी वाहने रस्त्यावर असताना ‘तुम्ही आम्हालाच का अशी सूचना केली. इतर वाहन चालकांना पण तुम्ही सांगा’ असे बोलत सागर, आतिष यांनी वाघेरे यांच्याशी वाद घातला. ‘तु तुझे काम कर. बाकीच्या गाड्या काढून घे, आम्हाला तू शिकवू नकोस,’ अशी दमदाटी केली.

दोघेही वाहनातून खाली उतरून हवालदार वाघेरे शासकीय गणवेशात असताना त्याचा मान ठेवता त्यांना धक्काबुक्की केली. ‘तुझ्या सारखे आम्ही अनेक पाहिले आहेत. आणि असे कितीतरी आमच्या समोर आले आणि गेले आहेत,’ अशा शब्दात हवालदाराचा अवमान केला. हवालदार वाघेरे या इसमांच्या कारचा मोबाईलमधून फोटो काढत होते. त्यावेळी सागर, आतिषने हवालदाराला शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. नरवडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.