कल्याण – पाच लाख रूपयांच्या बदल्यात एकूण सात लाख रूपयांची सुट्टी रक्कम देतो असे सांगून एका भामट्याने पुणे येथील वाघोली लांडगे काॅम्पलेक्समध्ये राहत असलेल्या एका जमीन खरेदी विक्री व्यवहारातील मध्यस्थाला उल्हासनगरमध्ये बोलविले. तेथून आपण सुट्टे पैसे घेण्यास कल्याणला जाऊ असे सांगून पायी रस्त्याने जात असताना भामट्यासह तीन जणांनी आम्ही पोलीस आहोत असे खोटे सांगून सुट्टे पैसे न देता मध्यस्थाची पाच लाख रूपयांची रक्कम लुटून पळ काढला. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

दीपक मारूती शिंदे (४६) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते पुणे परिसरात जमीन खरेदी विक्रीचे मध्यस्थ म्हणून व्यवहार करून देतात. ते पुणे येथील वाघोली भागात राहतात. फसवणूक करणारे चार इसम हे ३५ ते ४५ वयोगटातील आहेत. हा फसवणुकीचा प्रकार कल्याण पूर्वेतील राॅयल रेसिडेन्सी भागात घडला आहे.

मध्यस्थ दीपक शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपणाजवळ जमीन खरेदी विक्री व्यवहारातील पाच लाख रूपयांची रक्कम होती. या रकमेच्या बदल्यात आपणास १० रूपये, ५० रूपये, १०० रूपये दराच्या सुट्ट्या नोटा हव्या होत्या. यासाठी आपण राजेश नावाच्या इसमाशी संपर्क साधला होता. त्याने अशाप्रकारे सुट्ट्या नोटा देण्याचे कबूल केले होते. पाच लाख रूपयांच्या बदल्यात सुट्टे सात लाख रूपये देण्याचे राजेश यांनी कबूल केले होते. वाढीव रक्कम मिळते म्हणून तक्रारदार दीपक शिंदे बुधवारी दुपारी १२ वाजता राजेशने दिलेल्या ठिकाणाप्रमाणे उल्हासनगरमध्ये ॲमेरशिया हाॅटेल येथे आले होते. तेथे राजेशने दीपक यांना त्यांची मोटार हाॅटेलच्या वाहनतळावर उभी करण्यास सांगितली.

आणि मोटारीतील पाच लाख रूपयांची रक्कम असलेली पिशवी सोबत घेण्यास सांगितली. आपण आता एका नवीन जागेत सुट्टे पैसे घेण्यासाठी जात आहोत असे राजेशने दीपक यांना सांगितले. त्या बोलण्यावर विश्वास ठेऊन दीपक आणि राजेश उल्हासनगर येथील हाॅटेलकडून कल्याणच्या दिशेने राॅयल रेसिडेन्सीच्या दिशेने पायी जात होते. राजेश यांनी आपणास लुटण्यासाठी काही बनाव रचला आहे हे दीपक यांच्या लक्षात आले नाही. दीपक यांच्या सोबत त्यांचा साथीदार शिव चव्हाण होते.

आपण कल्याण दिशेने जात आहोत असे सांगत असताना दीपक आणि राजेशच्या पाठीमागून एक स्काॅर्पिओ वाहन आले. त्या वाहनावर पोलीस नावाचा फलक होता. ती मोटार अचानक दीपक आणि राजेश यांच्या दिशेने येऊन थांबली. त्यामधून एकूण तीन इसम उतरले. त्यांनी दीपक शिंदे यांना काही कळण्याच्या आत आम्ही पोलीस आहोत. अशी आक्रमक भूमिका घेत दीपक आणि त्यांचा साथीदार शिव चव्हाण यांना फैलावर घेतले. आणि हे पैसे कुठे चालविले आहेत हे प्रश्न विचारले. या सगळ्या घटनेत अचानक राजेश सहभागी झाला. तोही दीपक आणि शिव यांना दटावणी करू लागला.

त्यावेळी राजेशने आपणास सुटे पैसे देण्याचे आमिष दाखवून आपणास कल्याणला बोलविले आणि साथीदारांच्या मदतीने लुटले असल्याचे दीपक यांच्या लक्षात आले. राजेशसह त्याच्या तीन साथीदारांनी दीपक शिंदे यांत्या जवळील पाच लाखाची रक्कम लुटून मोटारीतून पलायन केले. दीपक यांनी या फसवणूक प्रकरणी राजेशसह तीन साथीदारांविरूध्द तक्रार केली आहे.