कल्याण – कल्याण पूर्वेतून उल्हासनगरकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा काही भाग दोन दिवसापूर्वी खचला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या पुलावरून होणारी वाहतूक अन्य मार्गान वळविण्यात आली आहे. मुख्य वर्दळीचा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने या पुलाच्या परिसरातील कल्याण पूर्व वालधुनी परिसरातील सर्व रस्ते मार्ग वाहतूक कोंडीने शनिवारी गजबजून गेले. पाच मिनिटाच्या अंतरासाठी प्रवाशांना चाळीस मिनिटे लागत आहेत.
शहाड उड्डाण पुलावर खड्डे असल्याने अनेक वाहने या पुलावरून न जाता कल्याण पूर्व, उल्हासनगर भागातील अंतर्गत रस्त्यांवरून कल्याण पश्चिम, पूर्व, शहाड, उल्हासनगर भागात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. इतर पर्यायी रस्ते मार्ग अरूंद आहेत. या रस्त्यांवरून अवजड, मोठ्या प्रवासी वाहतूक बस धावत आहेत. या रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांची वाहने उभी आहेत. त्यामुळे वालधुनी परिसरातील रस्ते मार्गांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीत कामावरून परतणारे प्रवासी, मालवाहू वाहने, रिक्षा चालक, दुचाकी स्वार अडकून पडले आहेत.
या कोंडीतून सुटका होण्यासाठी अनेक वाहन चालकांनी उलट मार्गिकेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समोरून येणारी आणि उलट मार्गिकेतील वाहने जाण्यास मार्ग नसल्याने पर्यायी रस्ते मार्ग कोंडीत अडकले आहेत. उल्हासनगर, वालधुनी रस्ता कोंडीने गजबजून गेला आहे. कल्याण पूर्व, पश्चिमेतील वाहतुकीवर या कोंडीचा परिणाम झाला आहे. दुचाकी स्वार, मोटार चालक मनमानी पध्दतीने या कोंडीत घुसल्याने वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक होत आहे.
पत्रीपूल ते लालचौकी दरम्यान मेट्रो कामांमुळे, रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी कामांमुळे कोंडीत भर पडत असल्याने प्रवासी हैराण आहेत. शहरांतर्गत आणि शहराबाहेरून येणारी वाहने या कोंडीत आणखी भर घालत आहेत. आम्ही बदलापूर भागातून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे नाटक पाहण्यासाठी चाललो आहोत. नाटक सुरू होऊन अर्धा तास उलटला तरी आम्ही अद्याप वाहतूक कोंडीत अडकलो आहोत, असे वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका प्रवासी कुटुंबाने सांगितले.