कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील मोहन प्राईड या उच्चभ्रूंच्या गृहसंकुलात एका वधूच्या विवाहानिमित्त हळदीचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. १५० वऱ्हाडी या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात रात्रीचे भोजन केल्यानंतर सर्व वऱ्हाडींना उलट्या, जुलाब सुरू झाले. लहान मुले, ज्येष्ठ, वृध्द यांना एकाच वेळी त्रास सुरू झाला. ही मंडळी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड भागातील रुग्णालयात दाखल झाली. वधू आणि तिच्या नातेवाईकांची प्रकृती ढासळल्याने अखेर दुसऱ्या दिवशी होणारा विवाह सोहळा रद्द करावा लागला.
या भोजनातील अन्न विषबाधेप्रकरणी हळदी समारंभाच्या आयोजक आणि वधुच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भोजन तयार करणाऱ्या मालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित भोजनकार हा अहमदाबाद येथील असल्याचे समजते.
वधुच्या कुटुंबीयांमधील एका ज्येष्ठाने सांगितले, मोहन प्राईडमध्ये आमच्या कुटुंबातील मुलीचा विवाह सोहळा होता. यानिमित्ताने शनिवारी संध्याकाळी हळदी समारंभ आयोजित केला होता. आमचे दूरवरचे नातेवाईक कल्याणमध्ये आले होते. त्यांची हाॅटेलवर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संध्याकाळी सर्व वऱ्हाडी मंडळी हळदी समारंभासाठी मोहन प्राईड संकुलात हजर होती. हळदी समारंभ झाल्यानंतर रात्री भोजन समारंभ झाला.
एका भोजन तयार करणाऱ्या ठेकेदाराला भोजनाचा ठेका दिला होता. भोजन झाल्यानंतर आमचे काही नातेवाईक हाॅटेलवर राहण्यासाठी गेले. अंबरनाथ, मुरबाड परिसरातून काही नागरिक हळदीसाठी आले होते. रात्री साडे अकरा वाजल्यानंतर आम्हाला सर्व ठिकाणाहून भोजनानंंतर उलट्या जुलाब सुरू झाल्याचे वऱ्हाडी नातेवाईकांकडून सांगण्यात येऊ लागले. हे ऐकत असतानाच आमच्या घरातील कुटुंबीयांना उलट्या, जुलाब सुरू झाल्या. हा प्रकार होत असताना असह्य वेदना प्रत्येकाला होत होत्या. लहान मुले, ज्येष्ठ यांचे यामध्ये सर्वाधिक हाल झाले.
प्रत्येक वऱ्हाडी आपल्या जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. उपचारानंतर काही जणांंना घरी सोडण्यात आले.
विवाह सोहळा रद्द
हळदीच्या कार्यक्रमातील भोजन घेतल्याने वधुला उलट्या, जुलाबचा त्रास झाला. वधुचे कुटुंबीय उलट्या, जुलाबाने अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी लग्न सोहळ्यात मुलगी मांडवात उभी कशी राहील असा प्रश्न निर्माण झाला. प्रत्येक जण अत्यवस्थ झाल्याने अखेर लग्न सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे वधुच्या कुटुंबीयांनी सांगितले. भोजन तयार करणाऱ्याकडून भोजन करताना चूक झाली. त्याचा त्रास आम्हाला झाला. आमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक असे एकूण १० ते १२ लाखाचे नुकसान झाले, असे वधुच्या कुटुंबियांनी सांगितले. या सर्व प्रकरणी आम्ही खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, असे वधुच्या कुटुंबीयांनी सांगितले.
पोलिसांकडून तपास
मोहन प्राईड इमारतीत १२५ लोकांना हळदी समारंभातील भोजनातून विषबाधा झाली होती. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. सर्वजण उपचार घेऊन घरी गेले आहेत. याप्रकरणात चौकशी करून पुढील कारवाई करण्याची तजविज ठेवली आहे, असे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती आंधळे यांनी सांगितले.
