कल्याण – दारूचे व्यसन असलेल्या एका पतीने पत्नी आपणास पैसे देत नाही म्हणून रागाच्या भरात घरातील गॅसवर उकळत ठेवलेले मटण आणि त्यामधील उकळलेले पाणी पत्नी, आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या अंगावर फेकले. यामध्ये पत्नी आणि अल्पवयीन मुलगा गंभीररित्या भाजला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी मद्यपी पती विरूध्द पत्नीने तक्रार केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

आमिर शाहित खान या दारूड्या पतीविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमिर यांची पत्नी गुलशन खान यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे कुटुंब कल्याण पूर्वेतील वालधुनी भागातील सुन्नी जामा मशिद भागातील एका चाळीत राहते.

पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की पती आमिर, पत्नी गुलशन आणि त्यांची दोन अल्पवयीन मुले गुरूवारी दुपारी घरात होती. पती आमिर खान पत्नीकडे पैसे देण्यासाठी तगादा लावत होता. पत्नी पैसे देण्यास नकार देत होती. यावरून त्यांच्यात बोलाचाली सुरू होती. पत्नी गुलशन पैसे देत नाही म्हणून पती आमिरने रागाच्या भरात पत्नीला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्याचवेळी आमिरने आपला पाच वर्षाचा मुलाच्या सदऱ्याच्या गळपट्टीला धरले आणि त्याला ओढत स्नानगृहाकडे ओढत नेले. मुलाला पतीच्या ताब्यातून सोडविण्यासाठी पत्नी जोराने धावली.

त्यावेळी मुलाला सोडविताना पती, पत्नी यांच्यात जोरदार झटापट झाली. यावेळी घरात स्वयंपाक घरात गॅसवर गुलशनने भोजनासाठी मटण शिजत ठेवले होते. पत्नी आपणास पैसे देत नाही या रागातून आमिरने गॅसवर शिजत ठेवलेला मटणाचे गरम पाण्याने उकळत ठेवलेले पातले हातात पकडून जोराने पत्नीच्या दिशेने फेकले. उकळलेले पाणी, मटणाचे तप्त तुकडे पत्नी गुलशन हिच्या हातापायवर पडले. त्याचवेळी अल्पवयीन बालक तेथे असल्याने त्याच्याही अंगावर उकळलेले पाणी पडले. उकळलेले पाणी अंगावर पडून दाह सुरू झाल्याने मुलगा मोठ्याने रडू लागला. गुलशनने बाजुला राहत असलेल्या आपल्या बहिणीला घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन प्रथमोपचार करून घेतले. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन मद्यपी पती आमिर खान विरूध्द तक्रार केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलांचे संरक्षण आणि काळजी कायद्याने आमिर खान विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महात्मा फुले पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.