कल्याण: शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यावर केवळ फौजदारी गुन्हा दाखल करून उपयोग नाही, तर त्यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी कल्याणमधील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कल्याण, पूर्व पश्चिम भागातील आपली रुग्णालये, खासगी दवाखाने बुधवारी बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण शाखेच्या सर्व औषधोपचारी शाखांमधील सदस्य डाॅक्टरांनी कल्याण पूर्व, पश्चिम भागातील आपली खासगी रुग्णालये, दवाखाने बुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवली आहेत. शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंखे यांना शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी केलेली मारहाण, तसेच, रमेश म्हात्रे यांनी परिचारिका नमिता उबाळे, द्रव्या गिरी यांना केलेल्या अरेरावीवरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्र, विविध स्तरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो रूपये खर्च, कष्ट, मेहनत करून वैद्यकीय पदवी मिळवून रूग्ण सेवेत आलेल्या नवतरूण डाॅक्टरांना लोकप्रतिनिधींच्या हस्ते उमेदीच्या काळात मारहाण, हल्ला होत असेल तर कोण येईल या क्षेत्रात आणि कोण नोकरी करील पालिकेच्या रुग्णालयांत अशा उद्विग्न प्रतिक्रिया डाॅक्टरांकडून देण्यात येत आहेत. ही मारहाण ही विकृतीची लक्षणे आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया डाॅक्टरांनी दिल्या.

म्हात्रेंना अटक करा

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक होत नाही तोपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशन आपली विविध पध्दतीने कल्याण, डोंबिवलीत आंदोलने सुरूच ठेवणार आहे. अशा गैरप्रकार आणि विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाहीतर येणाऱ्या काळात डाॅक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करणे मुश्किल होईल. त्यांचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कल्याण शाखेचे अध्यक्ष डाॅ. राजेश राजू यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयांमध्ये शुकशुकाट

पालिकेच्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, डाॅक्टरांनी आज दुसऱ्या दिवशी कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. जोपर्यंत नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक होती नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय पालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे. म्युनिसपल कर्मचारी कामगार सेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

पालिका, खासगी रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभाग बंद असल्याने सकाळीच रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना परत जावे लागले. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

शासकीय कर्तव्य बजावताना शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना मारहाण झाली आहे. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी शासनाची आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, पोलीस पाहतील, असे करून आपण त्या डाॅक्टरांना वाऱ्यावर सोडतो. यामधून मारकुटे लोकप्रतिनिधी सोकावतात. डाॅक्टरांना मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधीसह समर्थकांवर कठोर कारवाई करून त्यांचा दावा जलदगती न्यायालयासमोर चालला पाहिजे. शासन रुग्णालयातील राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून डाॅक्टर मारहाण घटनेचा निषेध केला आहे.

  • अजय क्षीरसागर महाराष्ट्र सचिव, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ.

एक नगरसेवक पोलीस संरक्षण, खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात पालिका रुग्णालयात जाऊन तेथील नवतरूण डाॅक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण करतो. राज्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे याची गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. अशी विकृती फोफावली तर वैद्यकीय पेशात कोणी येणार नाही.

  • डाॅ. श्रीनिवास साठे कल्याण इतिहासाचे अभ्यासक.