कल्याण – राज्याच्या विविध भागात जाऊन देवदर्शन करून कल्याण मधील अटाळी गावात परतलेल्या भाविकांच्या बसवर अटाळी गावात १० महिला, पुरूषांच्या इराणी टोळीने हल्ला करून, बसवर दगडफेक करून भाविकांना गंभीर जखमी केले. यामधील एका तरूणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणमधील गुन्हेगारांचा अड्डा म्हणून इराणी वसाहत ओळखली जाते. अनेक सराईत गुन्हेगार या वस्तीत राहत असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
इराणी वस्तीमधील मुंढा या तरूणासह इतर १० इराणी महिला, पुरूषांविरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटाळी गावातील रंजना राजेश पाटील यांनी या हल्ल्याप्रकरणी तक्रार केली आहे. रंजना पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, गेल्या आठवड्यात आम्ही राज्याच्या विविध भागात देवदर्शनासाठी गेलो होतो. अटाळी, वडवली भागातील ४० भाविक या देवदर्शन प्रवासात सहभागी झाले होते. दोन दिवसापूर्वी आम्ही देवदर्शन करून अटाळी गावात खासगी बसने परतत होतो. वडवलीहून बस अटाळी गावाकडे जात होती. यावेळी समोरून मुंढा नावाचा एक इराणी तरूण दुचाकीवरून आला. त्याने बसला समोरून जोराने कट मारली. बस चालकाने सावधानता बाळगली म्हणून अन्यथा बस रस्त्याच्या कडेला कलंडली असती. या दुचाकी स्वाराने पुढे जाऊन बससमोर दुचाकी उभी करून बस चालकाला खाली उतर तुला मी बघतो असे बोलण्यास सुरूवात केली. त्यामुळे बसमधील भाविकांचा खोळंबा झाला.
स्वताची चूक असताना दुचाकी स्वार बस चालकाला शिवीगाळ करू लागला. त्यामुळे बसमधील माझा मुलगा दुर्गेश पाटील हा बस मधून खाली उतरला. त्याने तु बस चालकाला आणि बस मधील लोकांना शिवीगाळ का करत आहे, असे प्रश्न केले. त्यावेळी दुचाकी स्वार मुंढा हा इराणी तरूण दुर्वेश याला शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. यावेळी बसमधील सर्व भाविक खाली उतरून त्या तरूणाला रोखू लागले.
तेवढ्या इराणी वस्तीमधील १० इराणी महिला, पुरूष बसच्या दिशेने धावत आले. त्यांनी भाविकांना शिवीगाळ करत भाविक आणि बसच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत एक दगड दुर्वेश पाटील याच्या डोक्याला लागला. तो रक्तबंबाळ झाला. याशिवाय कविता पाटील, सुवर्णा पाटील यांनाही दगड लागल्याने त्या जखमी झाल्या.दुर्वेशला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखम गंभीर असल्याने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू करून आंबिवली, अटाळी भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून दगडफेक करणाऱ्या इराणी लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.
