कल्याण – अमेरिका-इस्त्रायल आणि इराण या मध्य पूर्वेतील देशांमध्ये सुरू असलेल्या धमासान युध्दामुळे दुबईत अबुधाबी शहरात कल्याणमधील सहा पर्यटक मागील पाच दिवसांपासून अडकून पडले होते. सर्व विमान सेवा बंद. पर्यटनाचा कालावधी संपून आपल्या मायदेशी निघण्याची वेळ आली आणि युध्दामुळे अडकून पडावे लागल्याने या पर्यटक कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरली होती. परंतु, भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे दुबईतून काही विशेष विमाने भारतात सोडण्यात आली. या विशेष विमानातून कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले पर्यटक कुटुंब सुखरूप मुंबईत आणि तेथून कल्याणमधील घरी पोहचले.

गेल्या महिन्यात कल्याणमधील ज्येष्ठ व्यावसायिक डी. बी. जाधव आपल्या कुटुंबातील सहा सदस्यांना घेऊन पर्यटनासाठी दुबई येथे गेले होते. दुबईत हा कालावधी पर्यटनासाठी सुयोग्य असतो. त्यामुळे अनेक भारतीय आणि देशोदेशीची पर्यटक पर्यटनासाठी दुबईत या कालावधीत पोहचतात. २४ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ व्यावसायिक जाधव आपल्या कुटुंबियांसह दुबईत पोहचले.

पर्यटनाची निश्चित केलेली ठिकाणे पाहिली. त्याचवेळी अचानक मध्य पूर्वेत अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्या घमासान युध्द सुरू झाले. इराणने युध्दखोर अमेरिका, इस्त्रायल देशांच्या मित्र राष्ट्रांबरोबर हल्ले सुरू केले. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमधील देशांचा समावेश होता. इराणच्या हल्ल्यांनी दुबईला लक्ष्य करण्यात आले. अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणने लक्ष्य केले होते. दुबई विमानतळ परिसरात होणारे कानठळ्या बसविणारे हल्ले पर्यटकांच्या हदयाचे ठोके चुकवित होते. विमान सेवा बंद. त्यात हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्याने अडकून पर्यटक पडलेले देवाचा धावा करून विमान सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी. आणि भारत सरकारने विशेष विमान सेवा सुरू करून आम्हाला सुूखरूप भारत देशात घेऊन जावे म्हणून पर्यटकांनी दृश्यध्वनी चित्रिफिती समाज माध्यमांत टाकून, भारत सरकारला पाठवून आपल्या व्यथा मांडल्या होत्या.

भारत सरकराने दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्या युध्दात आपले कुटुंबीय दुबईत अडकल्याने कल्याणमधील जाधव कुटुंबीयांचे कल्याणमधील नातेवाईक अस्वस्थ होते. ते भारतात राहून भारत सरकार, महाराष्ट्र सरकारशी संपर्क करून दुबईत अडकलेल्या आपल्या नातेवाईकांच्या परतीसाठी प्रयत्न करत होते. हवाई हल्ल्यांमुळे उध्दवस्त होणाऱ्या इमारती. स्फोटकांचे हदयाचा ठोका चुकविणारे आवाज यामुळे सर्वच पर्यटक भेदरलेले होते. अबुधाबी येथून विशेष विमान भारत देशात सोडण्यात आले. या विमाने कल्याणमधील अबुधाबीत अडकलेले सहा पर्यटक मायदेशी परतले. आपले नातेवाईक सुखरूप मायदेशी परतल्याने कल्याणमधील जाधव यांच्या घरी त्यांचे रांगोळ्या घालून जंगी स्वागत करण्यात आले. आपण घरी सुखरूप पोहचलो याचा आनंद जाधव कुटुंबीयांसह त्यांच्या मित्रपरिवाराने साजरा केला.

(अबुधाबीत अडकलेले कल्याणचे जाधव कुटुंबीय सुखरूप परत.)