कल्याण – कल्याणमधील रहिवासी असलेली आणि मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये टेक्सटाईल्स डिझाईन शेवटच्या वर्षाचा अभ्यास करणारी जाग्रवी प्रदीप सुळे हिने महाविद्यालयातील कलाकृती प्रदर्शनात वन्यजीव जीवन, जतन, संवर्धन, सहजीवन, अधिवास या विषयावरील एक कलाकृती सादर केली होती. प्रदर्शनात ही कलाकृती अव्वल ठरल्याने शासनाच्या टेक्सटाईल्स डिझाईन विभागाने या कलाकृतीला पसंती देऊन ही कलाकृती तयार करणाऱ्या जाग्रवीचा प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान केला.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये विद्यार्थ्यांच्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. टेक्सटाईल्स डि़झाईनचे विद्यार्थी या प्रदर्शनात सहभागी झाले होते. जाग्रवीने आपल्या आवडीच्या वन्यजीव परिसंस्था, वन्यजीवांचे सहजीवन, संचार, अधिवास याविषयावरील एक कलाकृती प्रदर्शनात मांडली होती. वन्यजीव, प्राणी यांच्या प्रतिमा या केवळ आकृत्या नाहीत तर त्या मानसिक अवस्थांचे प्रतिक आहेत. या वन्यजीवांचे बाह्यभाव आपणास विविध प्रकारचे त्यांचे अंगभाव दाखवित असतात. निकोप भावनेतून हा जीव वनात वावरत असतो. त्यापासून मानवी मनाने कोणता बोध घ्यायचा, हे जाग्रवीने आपल्या कलाकृतीमधून सादर केले होते.
प्रदर्शनात ही कलाकृती अव्वल ठरली. शासनाच्या टेक्सटाईल्स विभागाने या कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा मान दिला. शासनाचे टेक्सटाईल्स डिझाईन विभागातील वरिष्ठ आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधील मान्यवरांच्या उपस्थितीत जाग्रवी सुळेला सन्मानित करण्यात आले.
चित्रकलेची आवड
जाग्रवीला शालेय जीवनापासून चित्रकलेची आवड होती. आई, वडिलांनी तिची ही आवड जपण्यासाठी तिला वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन, साहाय्य केले. कल्याणच्या सुभेदारवाडा शाळेतून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीत ती गुणवत्ता यादीत प्रथम स्थानी होती. शाळेत तिला सहस्त्रबुध्दे, चित्रकला शिक्षक मयूर पवार यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता चौथीपर्यंत तिने विविध चित्रकला स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला. पाचवीत असताना जाग्रवीने मुंबईत जवाहर बालभवन येथे आयोजित चित्रकलेच्या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत तिने यश मिळवून शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले होते.
रेखाकला परीक्षांमध्ये जाग्रवीने अव्वल स्थान प्राप्त केले. जाग्रवीचा चित्रकलेत हातखंडा असल्याने तिच्या आवडीप्रमाणे पालकांनी तिला जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश मिळून दिला. या प्रवेशाच्या सीईटीमध्ये तिने अव्वल स्थान मिळविले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मुंबई येथे ती आता टेक्सटाईल डिझाईन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत आहे. आवड, जिद्द, मेहनत या बळावर आपण हे यश मिळवले आहे. ती डूडल वर्क, पेन्टिंग्ज उत्तम करते.

