कल्याण : व्यावसायिकाला अधिकृतपणे महसूल विभागाने दगड उत्खननासाठी खाणपट्टा मंजूर केलेला असताना या खाणपट्ट्याच्या जमिनीलगतच्या २० गुंठेच्या शासकीय जमिनीवर बेकायदा, महसूल विभागाच्या कोणत्याही परवानग्या न घेता दगड उत्खनन केल्या बद्दल महसूल विभागाने कल्याण जवळील कांबा भागातील खाणपट्टा मालक आणि इतर जमीन मालक अशा एकूण नऊ जणांच्या विरूध्द टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
म्हारळ विभागाच्या मंडल अधिकारी प्रीती भास्कर घुडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खाणपट्टाधारक आणि जमीन मालक भातवत राॅय, संग्राम यादव (रा. खडकपाडा, कल्याण), अविनाश वसंत चौधरी (रा. बदलापूर), मोहन संजीव शेट्टी (रा. डोंबिवली), कुंडलिक सावळाराम बनकरी, मोतिराम सावळाराम बनकरी, अनंता सदानंद बनकरी, नीलेश सदानंद बनकरी, आत्माराम नामदेव बनकरी (सर्व राहणार- कांबा, कल्याण) यांच्या विरूध्द महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४, ४८ (७) सह खाण व खनिज विनीनियमन, पर्यावरण संवर्धन अधिनियमाने गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पर्यावरण संवर्धनाचा विचार करून आणि विधीमंडळात उपस्थितीत झालेल्या दगडखाणींमुळे होणारे प्रदूषण याचा विचार करून राज्याच्या विविध भागातील दगड खाणी सील करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे कल्याण तालुक्यातील म्हारळ, कांबा भागातील दगडखाडी महसूल विभागाने सील केल्या आहेत.
नियमबाह्यपणे उत्खनन
मंडल अधिकारी प्रीती घुडे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, कल्याण तालुक्यातील कांबा गाव हद्दीत सर्वे क्रमांक ५८ चे हिस्से आणि ५९ च्या हिश्श्यांवर गौण खनिज उत्खननासाठी (दगड उत्खनन) यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय. खाणपट्टा मंंजूर करण्यात आला आहे. त्यातून गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे. कांबा हद्दीतील सर्वे क्रमांक ५५-१ या शासकीय जमिनीवर उल्हासनगर येथील व्यावसायिक मुरली वलेच्चा यांना मार्च २०२५ मध्ये शासकीय खाणपट्टा मंजूर करण्यात आला आहे. या खाणपट्ट्याची उप अधीक्षक भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी करण्यात आली.
या मोजणीचा अहवाल गेल्या महिन्यात तहसीलदार कल्याण यांना भूमि अभिलेख विभागाकडून दाखल करण्यात आला. या मोजणी अहवालावरून जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुर केलेल्या शासकीय खाणपट्ट्याच्या व्यतिरिक्त सर्वे क्रमांक ५५-१ या शासनाच्या जमिनीवर २८ गुंठे क्षेत्रात शासनाची कोणतीही आवश्यक परवानगी न घेता नियमबाह्यपणे उत्खनन केले असल्याचे आढळून आले. या उत्खनन केलेल्या शासकीय जमिनीची ई. टी. एस. यंत्राद्वारे मोजणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार विकास गारूडकर यांनी भूमि अभिलेख विभागाला दिले आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करून दिलेल्या खाणपट्ट्याच्या व्यतिरिक्त खाणपट्टाधारक आणि इतर जमीन मालकांनी शासकीय जमिनीत नियमबाह्यपणे दगड उत्खनन करून नियमभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरूध्द ही तक्रार दाखल करण्यात येत आहे, असे मंडल अधिकारी प्रीती घुडे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या भागातील दगडखाणी महसूल विभागाने सील केल्याने दगडखाणी चालक हवालदिल झाले आहेत.
