कल्याण : लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने कल्याण-कसारा मार्गावरील उपनगरी रेल्वे सेवा आधीच अनियमित असताना, मंगळवारी सकाळी कसारा रेल्वे स्थानकात गाड्या एका मागोमाग खोळंबल्याने रेल्वे वाहतुकीचा फज्जा उडाला. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे मुंबईकडे जाणारी उपनगरी रेल्वेसेवा तासाभराहून अधिक काळ विस्कळीत झाली. याचा मोठा फटका नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांना बसला.

या प्रकाराबाबत कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी निषेध नोंदवला.कसारा रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या व कसारा-कल्याण उपनगरी रेल्वेगाड्या एका मागोमाग उभ्या राहिल्या. त्यामुळे अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी कामावर जाण्याच्या व शाळा-महाविद्यालयांत पोहोचण्याच्या गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

कसाराहून मुंबईच्या दिशेने जाणारी उपनगरी रेल्वेगाडी तासाभराहून अधिक खोळंबून राहिली. उंबरमाळी स्थानकातून सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने सुटणारी गाडी प्रत्यक्षात सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी रवाना झाली. तर ८ वाजून २९ मिनिटांनी सुटणारी गाडी ९ वाजून ३५ मिनिटांनी सोडण्यात आली. मुंबईहून कसाऱ्याकडे जाणारी सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांची रेल्वेगाडी उंबरमाळी स्थानकात सकाळी ८ वाजता पोहोचली. तसेच, सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांनी कसाऱ्याकडे जाणारी लोकल ८ वाजून ५५ मिनिटांनी उंबरमाळी स्थानकात आली.

मेल-एक्स्प्रेस वेळेत, लोकलचा खोळंबा

उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत असताना लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या मात्र नियोजित वेळेत धावत होत्या. रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या वा येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमधील असंतोष वाढत असून, त्याचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशारा संघटनेचे राजेश घनघाव यांनी दिला. उपनगरी रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाल्यानंतरही ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना नेमके कारण सांगण्यात आले नाही. केवळ उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याच्या सूचना दिल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

आधीच मेगाब्लॉक, त्यात लोकलचा खोळंबा कसारा ते आसनगावदरम्यान दुपारी व रात्रीच्या वेळी सलग १२ दिवसांचा विशेष रेल्वे वाहतूक ब्लॉक सुरू असल्याने प्रवाशांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच सकाळच्या गर्दीच्या वेळी गाड्या एकापाठोपाठ अडकल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली. रेल्वे प्रशासनाने उपनगरी रेल्वे सेवेचे योग्य नियोजन करावे, वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यास प्रवाशांना ध्वनिवर्धकाद्वारे तातडीने व स्पष्ट माहिती द्यावी, तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी केली आहे.