शहापूर: मुसळधार पावसामुळे कल्याण- कसारा रेल्वेमार्गावरील लोकल सेवा वारंवार विस्कळीत होत असताना रात्री उशिरापर्यंत अडकणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याण – कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी आपल्या घरी मोफत निवास आणि जेवणाची व्यवस्था करून देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या माणुसकीपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण – कसारा रेल्वेमार्गावरील लोकल सेवा वारंवार उशिराने धावत आहे. रुळांवर पाणी साचणे, सिग्नल यंत्रणेतील अडथळे आणि तांत्रिक बिघाड यामुळे अनेक गाड्या तासन्तास खोळंबत आहेत. परिणामी हजारो प्रवासी विविध स्थानकांवर रात्री उशिरापर्यंत अडकून पडत असून, घरी पोहोचण्याची चिंता, अन्न-पाण्याची गैरसोय, मोबाईलची संपणारी बॅटरी आणि कुटुंबीयांची काळजी अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कल्याण – कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी समाज माध्यमांद्वारे भावनिक आवाहन करत, रात्रीच्या वेळी घरी जाणे शक्य नसल्यास कोणताही संकोच न बाळगता माझ्या घरी या. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येईल, असा संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या घराचा पत्ता आणि संपर्क क्रमांकही जाहीर करून, एकमेकांना साथ देऊया, प्रवास सुखकर बनवूया, असे आवाहन केले आहे.
दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदारांना पावसाळ्यात रेल्वे विलंबाचा मोठा फटका बसतो. कार्यालयात उशिरा पोहोचल्यामुळे लेटमार्क, वेतन कपात, वरिष्ठांची नाराजी आणि मानसिक तणाव अशा समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत कोणत्याही स्वार्थाशिवाय अनोळखी प्रवाशांसाठी स्वतःच्या घराचे दरवाजे खुले करणाऱ्या उमेश विशे यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना आधार मिळत असून, संकटाच्या काळात जपलेली ही माणुसकी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
