कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, दुर्गाडी किल्ल्याजवळील नागरी वस्तीत बेकायदा हुक्का पार्लर सुरू करून मानवी आरोग्याला घातक प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ ग्राहकांना विक्री करणाऱ्या येथील दोन हुक्का पार्लर मालक, सेवक, ग्राहक अशा एकूण १४ जणांविरुद्ध पोलिसांनी सिगारेट व तंबाखु उत्पादने कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी हे छापे टाकले.
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा सर्कल येथील राॅकमाऊंट इमारतीच्या चौथ्या माळ्यावर राॅकमाऊंट लाॅऊन्ज नावाने प्रसाद विजय शिंदे (वय २६) हुक्का पार्लर चालवत होते. त्यांना सोयल सत्तार रूमानी (२४) सेवक म्हणून साहाय्य करत होता. साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना खडकपाडा, दुर्गाडी भागात नागरी वस्तीत हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती मिळाली होती.
गेल्या आठवड्यात खडकपाडा पोलिसांनी साहाय्यक आयुक्त होनमाने यांच्या निर्देशावरून या हुक्का पार्लरवर छापा टाकला. त्यावेळी तेथे पाच ग्राहक हुक्क्याचा स्वाद घेत होते. त्यांना ज्वालाग्रही पदार्थ हुक्का पार्लर चालकाकडून पुरवले जात होते. सुगंधित दरवळ हुक्का पार्लरमध्ये पसरला होता. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी आहे तरी हुक्का पार्लर मालक प्रसाद शिंदे, सोयल रूमानी ग्राहकांना ज्वालाग्रही पदार्थ देऊन धूम्रपान करण्यासाठी सेवा पुरवत होते, असे छाप्याच्यावेळी पोलिसांना आढळले.
नियमबाह्यपणे हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालक आणि ग्राहक यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार रवींद्र भालेराव यांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय खिरखिरे, यश गायकवाड, विक्रम पाडी, अनिरूद्ध शिंदे, सचिन शर्मा, प्रसाद शिंदे, सोयल रूमानी अशी गुन्हा दाखल इसमांची नावे आहेत.
दुर्गाडीजवळ छापा
कल्याण पश्चिमेतील दु्र्गाडी किल्ल्याजवळील एव्हेन्यू बिझनेस पार्कच्या तळमजल्याला दरबार हुक्का पार्लर मालक मोहम्मद हुसेन इब्राहिम सय्यद (३८) हुक्का कारागिर अभिजीत कुपरचंद सोनावणे (३२), सेवक साहिल गफर सय्यद (२८) हे संगनमताने हुक्का पार्लर चालवित होते. हुक्का सेवन करण्यासाठी आलेले चार ग्राहक छाप्याच्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. नियमबाह्य पध्दतीने हुक्का पार्लर चालवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशी कृती हुक्का पार्लर चालकांकडून केली जात असल्याने हुक्का पार्लर चालक आणि ग्राहकांविरूध्द खडकपाडा पोलीस ठाण्यात हवालदार कांतिलाल वारघडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अभिजीत सोनावणे, मोहम्मद सैय्यद, साहिल सय्यद, अक्षय सावंत, शान कुरेशी, मोहम्मद शेख, विशाल वायले अशी गुन्हा दाखल इसमांची आहेत. हुक्का पार्लरवरील या कारवाया साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या निर्देशावरून हवालदार रमाकांत पाटील, मनोहर चित्ते, दराडे, पोपट धुळगंड, चव्हाण, सुरज खंडाळे, चंद्रकांत ठाकूर, अविनाश पाटील, उपनिरीक्षक विजय भालेराव, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक भूषण देवरे व शोध पथकाचे पोलीस यांनी केल्या.
