कल्याण – कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील सर्वाधिक वर्दळीच्या गंधारनगर भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी पालिका हद्दीतील रस्ते सुस्थितीत करा, असे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी देऊनही गंधारनगर भागातील रस्त्यावरील खड्डे सुस्थितीत केले जात नसल्याने परिसरातील नागरिक, प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्यवर्गीय वस्तीचा भाग म्हणून खडकपाडा ओळखला जातो. कल्याण डोंबिवली पालिकेचे, शासकीय उच्चपदस्थ बहुतांशी अधिकारी याच भागात राहतात. असे असताना त्यांना हा खड्डे पडलेला रस्ता दिसत नाही का,असे प्रश्न नागरिक करत आहेत.

गणेशोत्सव दोन दिवसावर आला असताना हा रस्ता सुस्थितीत केला जात नसल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नागरिकांनी आपले गणपती या खड्डयांमधून न्यायचे का, असे प्रश्न केले आहेत. पालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित ठेकेदार, अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील विविध शाळांच्या बस खडकपाडा भागातील गंधारनगर भागातील या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून धावतात. आदळआपट करत प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करतात. या रस्त्यावरून पादचारी जात असतील तर त्यांच्या अंगावर खड्ड्यांमधील पाणी उडते. पायी जाणारे शाळकरी विद्यार्थी, पालकांना याचा सर्वाधिक त्रास होतो. रुग्णवाहिका, ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांची या रस्त्यावरून जाता हाल होतात. या रस्त्याच्या एका बाजुला पत्रे लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्याकडे सावधपणे चालणे एवढेच नागरिकांच्या हातात आहे. अनेक वेळा या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दुचाकी स्वार, सायकल स्वार खड्ड्यातील पाणी, खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी, सायकल घसरून पडत आहेत, असे या भागातील नागरिक, व्यापाऱ्यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर मात्र परिसरातील रहिवासी या रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा गांधारनगर, खडकपाडा भागातील नागरिकांनी दिला आहे. गांधारनगर रस्ता सुस्थितीत करा म्हणून या भागातील जागरूक नागरिकांनी पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. पण त्यांना लवकरच आपला रस्ता सुस्थितीत होईल अशी उत्तरे दिली जात आहेत. प्रत्यक्षात कोणतीही कृती केली जात नाही, असे नागरिकांनी सांगितले.