Tukaram Mundhe FDA action Kalyan: कल्याण शहराच्या विविध भागात पान टपरीतून प्रतिबंधित गुटखा दिवसाढवळ्या विक्री करणाऱ्या तीन पान टपरी चालकांविरूध्द ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पान टपरी चालकांकडून एकूण ११ हजार रूपयांचा प्रतिबंधित विविध प्रकारच्या सुगंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेत काही भागात गुटख्याचा साठा करून तो पान टपऱ्यांच्या माध्यमातून विक्री केला जात आहे, अशी गुप्त माहिती ठाणे येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. महिला अन्न सुरक्षा अधिकारी सा. भा. आगवणे, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हवालदार व्हटकर, आर. ए. शेख यांच्यासह खडकपाडा बारावे येथील आर मार्टजवळील गोदरेज हिल भागातील सिंग पान शाॅप दुकानात अचानक पोहचल्या. पथकाने सिंग पान शाॅप दुकानाची तपासणी केली.

दुकानात प्रतिबंधित विमल पान मसाला, सॅफरन पान मसाला, राजश्री पान मसाला, राजश्री कोल्हापुरी पान मसाला, बाजीराव, आरएमडी पान मसाला, राज कोल्हापुरी, रजनीगंधी असा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळला. पान टपरी चालक संतोष पारसनाथ सिंह (५०, रा. राधानगर, गोदरेज हिल, डोंबिवली) यांना हा साठा कुठून आणला याची विचारणा केली. त्यांनी ठिकाण सांगण्यास नकार दिला. पथकाने दुकानातील आठ हजार रूपये किमतीचा साठा जप्त करून सिंह याला ताब्यात घेतले.

पथकाने गोदरेज हिलजवळील किशोर वाईन शाॅप जवळील आमंत्रण पान शाॅप येथे छापा टाकला. तेथे तर प्रतिबंधित गुटख्याच्या माळा दुकानात दर्शनी भागात टांगण्यात आल्या होत्या. त्याच्या दुकानात प्रीमियम राजश्री पानमसालाचा साठा आढळला. पान टपरी चालक राजेश हरिजन (२४, रा. नंदकिशोऱ् भोईर चाळ, आंबिवली) याला पथकाने हा साठा कोठुन आणला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने त्याच्या दुकानातून सहाशे रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. राजेशला पथकाने ताब्यात घेतले.

पथक नंतर आंबिवली पश्चिमेतील मिनडे सदन मधील एन. डी. पान शाॅपमध्ये पोहचले. या पान टपरीचे मालक राहुल कुमार चौरासिया (३३, परशुराम टाॅवर, मुरबाड रोड, कल्याण) आहेत. या दुकानात प्रीमियम राज पानमसाला, विमल पान मसाला, कमला प्रसाद पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसालाच्या पुड्यांच्या माळा खुलेआमपणे टांगून ठेवण्यात आल्या होत्या. हा गुटखा कोठुन आणला याची माहिती चौरासिया याने दिली नाही. त्याच्या दुकानातून दोन हजाराहून अधिक रकमेचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला.

या तिघांना खडकपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. राज्यात प्रतिबंधित गुटखा विक्रीस बंदी आहे हे माहिती असताना या तिघा पान टपरी चालकांनी कायद्याचा धाक न बाळगता प्रतिबंधित गुटख्याची विक्री केली म्हणून या तिघांविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांकडून हा गुटखा कोठुन आणला याची माहिती पोलिसांना काढायची आहे. या तिघांच्या माहितीमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.