Kalyan Latur Highway Murbad Land Acquisition Farmers: मुंबई ते लातूर हा १२ तासांचा प्रवास पाच तासांचा करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ( MSRDC ) माध्यमातून कल्याण-लातूर जनकल्याण महामार्गाची उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर या सहा जिल्ह्यांमधून जात आहे. या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या २२ गावांमधील २७२ शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन बाधित होणार आहे. माझगाव आणि खंदारे गावातील सर्वाधिक जमीन या रस्ते महामार्गात जाणार आहे.
मुंबई, ठाणे परिसरातून लातूर जिल्ह्यात जाण्यासाठी पुणे, सोलापूरमार्गे किंवा बार्शीमार्गे जावे लागते. हा प्रवास १२ तासांचा आहे. हे अंतर पाच तासांचे करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून ४४२ किलोमीटर लांबीच्या या रस्ते मार्गाच्या उभारणीचे नियोजन केले आहे. हा मार्ग सहा मार्गिकांचा आहे. ३५ हजार कोटीच्या निधीतून या रस्ते मार्गाची उभारणी होणार आहे. या महामार्गाचे संरेखन निश्चित करण्यात आले आहे. कल्याण, मुरबाड, माळशेज घाट, ओतुर आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, अंबेजोगाई आणि लातूर या भागातून हा रस्ते मार्ग जात आहे, असे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
मुरबाडची ही गावे बाधित
मुरबाड तालुक्यातील काचकोळी गावातील १२ शेतकऱ्यांची जमीन, तोंडली गावातील १३ शेतकरी, सासणे गावातील ३ शेतकरी, न्हावे गावातील १४ शेतकरी, राव पाड्यातील ५ शेतकरी, केदुर्ली गावातील १७ शेतकरी, शेलारी गावातील १३ शेतकरी, खंदारे गावातील ४२ शेतकरी, कोरावळे गावातील १३ शेतकरी, कान्हर्ले गावातील ५ शेतकरी, माझगाव गावातील ४३ शेतकरी, तळावली गावातील १३ शेतकरी, खेडले गावातील १ शेतकरी, पाऱ्हे गावातील ७ शेतकरी, कांदळी गावातील ७ शेतकरी, पिंपळघर गावातील १९ शेतकरी, धसई गावातील १२ शेतकरी, शिरपूर गावातील ९ शेतकरी, चाफा गावातील ७ शेतकरी, एकलहरे गावातील ७ शेतकरी, पेंढारी गावातील १० शेतकरी. या गावच्या शेतकऱ्यांची ४० ते १०० टक्के जमीन या महामार्गाने बाधित होणार आहे. माझगाव आणि खंदारे गावातील सर्वाधिक शेतकऱ्यांची जमीन या रस्ते प्रकल्पाने बाधित होणार आहे.
माळशेज घाटात ८ किमी लांबीचा बोगदा
या रस्ते महामार्गाला माळशेज घाटाचा मोठा अडथळा पार करून पुढचा टप्पा गाठावा लागणार आहे. घाटाचा रस्ता प्रवासी, वाहन चालकांना सुकर व्हावा म्हणून माळशेज घाटात ८ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. या महामार्गाला सहा जिल्ह्यांमधील तालुके, महत्वाच्या गावांजवळ एकूण १७ अंत, बाह्य मार्गिका प्रवाशांच्या प्रवासाच्या सोयीचा विचार करून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा महामार्ग विरार-अलिबाग द्रृतगती महामार्ग,
सुरत-चेन्नई महामार्ग, पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रृतगती महामार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग आणि नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला जोडण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकल्प आता शासनाकडे अंतीम मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
कल्याण-लातूर महामार्गाचे सर्वेक्षण दहा वर्षापूर्वीच झाले आहे. या महामार्गासाठी मुरबाड तालुक्यातील २२ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी निश्चित करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतकरी आपल्या उपजिविकेच्या जमिनी या मार्गासाठी देणार नाही. माझगाव, खंदारे गावातील शेतकरी या रस्ते मार्गाने भूमिहिन होणार आहेत.- श्याम पष्टे शेतकरी, माझगाव-कान्हर्ले, मुरबाड.
