आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय

भगवान मंडलिक, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरात फलक लावताना यापुढे भाजपच्या फलकांवर शिवसेनेच्या एकाही नेते, पदाधिकाऱ्यांची प्रतीमा न लावण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे यापुढील काळात आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना, भाजप मधील स्थानिक पातळीवरील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

कल्याण पूर्व भाजप मंडळाच्या दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड, त्यांचे कार्यकर्ते यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. केंद्रीय मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड यांच्या विषयावर काही भाष्य करत नसल्याने भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी मंत्री पाटील, मंत्री चव्हाण यांना संपर्क केला. ते बैठकीत व्यस्त असल्याचे, दिल्ली येथे गेल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत पालिकेचे कर्मचारी लाच घेताना अटक

बैठकीत चर्चा

कल्याण जिल्हा भाजप मंडळाची गाव चलो अभियान, विकास संकल्प यात्रा आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनीमय करण्यासाठी कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसापूर्वी बैठक झाली. या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. याऊलट कल्याण पूर्वेतील भाजपची ताकद अधिक वाढविण्यासाठी काय करता येईल, याचे नियोजन करण्यात आले. आगामी काळात भाजपचे जे कार्यक्रम असतील त्या फलकांवर शिवसेनेच्या एकाही नेते, पदाधिकाऱ्याची प्रतीमा न लावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आमदार गायकवाड यांनी टोकाची कृती का केली, याचेही विचार मंथन वरिष्ठ पातळीवर झाले पाहिजे. त्यांच्या चुकीच्या कृतीचे समर्थन कोणीही करणार नाही, पण त्यांच्यावर ही वेळ का आली. ती कोणी आणली. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, गटार, आंबेडकर स्मारक आणि अशा अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे कोण आणत होते, याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करावा, अशीही मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी बैठकीत केली. आमदार गायकवाड यांच्यावर पक्षाने एकतर्फी कारवाई करू नये, अशीही चर्चा करण्यात आली.

हेही वाचा >>> कल्याण : महेश गायकवाड हल्ल्यातील संपूर्ण सीसीटीव्ही चित्रण प्रसारित

मागील वर्षी शिवसेना-भाजप मधील तेढ वाढल्यानंतर कल्याण पूर्वेतील भाजपच्या बैठकीत सार्वजनिक बांंधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला होता. कल्याण लोकसभेसाठी नवीन उमेदवार देण्याची मागणी लावून धरली होती. सामोपचाराने हा विषय मिटविण्यात आला होता. आता गोळीबार प्रकरणाने पुन्हा शिवसेना-भाजपची वितुष्टाच्या दिशेने स्थानिक पातळीवर वाटचाल सुरू आहे.

शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या अती त्रासामुळेच आमदार गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे भाजपच्या कल्याण, डोंबिवलीतील नेत्यांचे मत झाले आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत संपर्क अभियानावर चर्चा झाली. फलकावर प्रतीमा न लावण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर त्याबाबत माहिती नाही. – नरेंद्र सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा भाजप.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan local workers decision not put shiv sena leaders and office bearers photo on bjp hoarding zws
First published on: 07-02-2024 at 12:34 IST