अंबरनाथ : एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या ५०० कोटींचा गौप्यस्फोट, कल्याण लोकसभेत विविध पालिकांमध्ये भाजपसोबत सुरू असलेला संघर्ष व थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना खांदेपालटाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कल्याण लोकसभेतील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, उल्हासनगर व अंबरनाथ या शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख, विभागप्रमुख व शाखाप्रमुखांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. यावेळी जुन्या नव्यांचा मेळ साधत काही नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यांची घोषणा येत्या काळात होण्याची आशा आहे.
शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह मोजके शिवसैनिक शिंदेंच्या मागे तात्काळ उभे राहिले होते. त्यानंतर हळूहळू वैयक्तिक, राजकीय कारणातून अनेक जणांनी शिंदे गटात येणे पसंत केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या सर्वांमुळे शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाले. मात्र विधानसभा, लोकसभेत काही अंशी शिवसेना- भाजपमध्ये धुसपूस सुरूच राहिली. त्यानंतरच्या पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांमधला हा संघर्ष टोकाचा झाला. एकमेकांचे उमेदवार फोडण्यापर्यंत व एकमेकांविरूद्ध उभे राहण्यापर्यंत दोघांची मजल गेली. पालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागून दोन्ही पक्ष सत्तेत आले असले तरी संघर्ष काही थांबताना दिसत नाही.
यातच उल्हासनगर शहरात तर भाजपने लोकसभेत शिवसेनेचे काम करणार नाही, अशी थेट घोषणाच केली आहे. तर भाजप पदाधिकारी व शिवसेनेतील शाब्दिक चकमकीही थांबताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा काळ राहिला आहे. अशा स्थितीत कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेने आतापासून संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. नवरात्रीपासून शिवसेनेच्या वतीने विविध शहरांमध्ये, विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत. शहरप्रमुख, शाखाप्रमुख, विभागप्रमुखांच्या नेमणुका येत्या काळात होण्याची शक्यता आहे.
संधी आयारामांना की जुन्या जाणत्यांना?
गेल्या काही महिन्यांत पालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाले. भाजप, मनसे, ठाकरेंची शिवसेना या पक्षातून आलेले अनेक जण आता नगरसेवक बनले आहेत. उल्हासनगरात कलानी यांचा प्रवेश तर उल्लेखनीय ठरला आहे. अंबरनाथ, कल्याणमध्येही असेच प्रवेश झालेत. त्यामुळे आता पदाधिकारी निवडीत जुन्या जाणत्यांना संधी मिळते की नव्याने पक्षात आलेल्यांना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
