कल्याण – वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी असतात. या तक्रारींसाठी वीज ग्राहकांना महावितरण कार्यालयात येण्यास लागू नये आणि त्यांच्या तक्रारींचे घराच्या परिसरात निराकरण व्हावे म्हणून महावितरणच्या मुख्य अभियंत्यांच्या निर्देशावरून महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीत वीज तक्रार निवारण शिबीरे भरविण्यास सुरूवात केली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर येथील शिबीरात एकूण १६० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी स्मार्ट मीटरविषयक माहिती नागरिकांना दिली जाते.

बदलापूरमध्ये गेल्या आठवड्यात अशाच पध्दतीने एक शिबीर भरविण्यात आले होते. या शिबीरात ३०० हून अधिक वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या मनात स्मार्ट मीटरविषयी असलेले गैरसमज महावितरण अधिकाऱ्यांनी दूर केले. अनेक वेळा वीज ग्राहक वीज देयक, वीज मीटर आणि वीज पुरवठ्याच्या तक्रारी घेऊन महावितरण कार्यालयात येतात.

अनेक वेळा संबंधित कर्मचारी, अभियंता त्याच्या जागेवर नसेल, बाहेर क्षेत्रीय कामासाठी गेला असेल तर त्या नागरिकाला पुन्हा महावितरण कार्यालयात यावे लागते. यासाठी नागरिकांना होणारा त्रास विचारात घेऊन महावितरणने नागरिकांच्या दारात वीज तक्रार निवारण शिबीरे भरविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून नागरिकांच्या मनातील वीज विषयक अनेक प्रश्नांची सोडवणूक महावितरणचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत.

अंबरनाथमध्ये प्रतिसाद

वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण कडून अंबरनाथमध्ये तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरातील १०४ वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यात प्रामुख्याने वीज देयक, जुन्या वीज वाहिन्या बदलणे, नादुरुस्त मीटर आदी तक्रारींचा समावेश होता. यावेळी उपस्थित वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर संदर्भात माहिती देण्यात आली.

स्मार्ट मीटरविषयी नागरिकांच्या मनात असलेली वाढीव देयकाची भीती कशी चूक आहे. हे मीटर नेहमीच्या मीटरप्रमाणे कसे काम करतात याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. महावितरण अधिकारी अधीक्षक अभियंता विजय फुंदे , कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता अलका कावळे, यादव इंगळे हे या शिबीरात सहभागी झाले होते.

उल्हासनगरमध्ये शिबीर

महावितरणच्या उल्हासनगर -2 विभागाच्यावतीने वीज ग्राहकांसाठी सोमवारी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५० वीज ग्राहकांनी हजेरी लावली. वीज देयकासोबतच खराब वीज वाहिन्या, नादुरुस्त मीटर आदी बाबत वीज ग्राहकांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. उल्हासनगर उपविभाग क्रमांक ४ आणि ५ येथील ग्राहक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर संदर्भात माहिती देण्यात आली. त्यांच्या मनातील विविध शंका निरसन करण्यात आले. अधिक्षक अभियंता विजय फुंदे, कार्यकारी अभियंता राजेंद्र भांबर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश सुरडकर, दिलीप कुंभारे या शिबीरात सहभागी झाले होते.

 

फोटो ओळ

अंबरनाथमध्ये महावितरणच्या वीज ग्राहक तक्रार निवारण कार्यक्रमात सहभागी झालेले ग्राहक.