कल्याण : महावितरणच्या स्मार्ट वीज मीटर संदर्भात असलेले वीज ग्राहकांमधील गैरसमज दूरण्यासाठी महावितरणने थेट ग्राहकांच्या दारी प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व विभागात येणाऱ्या कासा गोल्ड व कासा रिओ या दोन गृह संकुलात रविवारी सुमारे ५०० वीज ग्राहकांना महावितरणच्या अभियंत्यांनी स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक दाखविले.
कासा रिओ गृहसंकुलाचे पदाधिकारी योगेश पाटील, मनीष मामनिया, कासा गोल्डचे समीर कोंढाळकर, निवृत्ती पाटील यांच्या पुढाकाराने स्मार्ट मीटर जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी वीजपुरवठा, वीज खंडित होण्याचे प्रकार, वीज देयकांमधील त्रुटी, स्मार्ट मीटरचा वापर या ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली व ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान केले.
स्मार्ट मीटर संदर्भात वीज ग्राहकांनी अधिक प्रश्न उपस्थित केले. स्मार्ट मीटर बसवल्याने वीज देयक अधिक प्रमाण येते. हे देयक महावितरणकडून कमी केले जात नाही, स्मार्ट मीटरच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत, असे अनेक प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केले. या प्रत्येक प्रश्नाचे महावितरणच्या अभियंत्यांनी स्मार्ट मीटरच्या प्रात्यक्षिकासह निराकरण केले.
महावितरणचे सहकार्य
– स्मार्ट वीज मीटर महा विद्युत उपयोजनद्वारे रिअल टाईम वीज वापर कसा पहायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित ग्राहकांना स्मार्ट मीटर संदर्भातील ॲप स्थापित करण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
– स्मार्ट मीटर मधील विविध वीज उपकरणे व त्यांच्या वीज वापरबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
– ग्राहकांनी स्मार्ट मीटरबद्दल ग्राहकाच्या वीज वापर तफावतीच्या बाबतची शंका दूर करण्याकरीता तक्रारीनुसार मीटर चाचणी करण्याची मागणी केली. ग्राहकांच्या मागणीनुसार सिरीज मीटरद्वारे तपासणी करण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. – बैठकीस महावितरणकडून विज बिल विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर, सहाय्यक अभियंता गणेश वग्रे, देयक व महसुल उपविभागातील लिपिक व कर्मचारी उपस्थित होते.
