कल्याण – कल्याण जवळील मलंगगड पहाड येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानचे पारपत्र (पासपोर्ट) तयार करून घेतले. या रहिवाशाने हे करताना आपले भारतीय नागरिकत्व लपून ठेवले. पाकिस्तानी पारपत्राच्या आधारे भारतात प्रवेश करून पुन्हा मलंगगड पहाड येथील आपल्या घरी राहू लागला. मुंबई क्षेत्रिय पारपत्र कार्यालयाला या रहिवाशाच्या पारपत्राविषयी संशय आला. हिललाईन पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा रहिवाशी दोषी आढळल्याने हिललाईन पोलिसांनी त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

चाँद अली अब्दुल रशीद असे गुन्हा दाखल रहिवाशाचे नाव आहे. ते अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील पहाड भागात राहतात. हवालदार दत्तात्रेय वाघ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार वाघ यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती, अशी की चाँद अली यांचे पारपत्र आणि नागरिकत्वाविषयी संशय आल्याने मुंबईतील क्षेत्रिय पारपत्र कार्यालयाने हिललाईन पोलिसांना चाँद अली यांचे पारपत्र आणि नागरिकत्वाविषयी चौकशी करण्यास कळविल होते. त्याप्रमाणे पोलिसांनी चाँद अली भारतीय पारपत्र मिळविण्यासाठी केलेल्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्या आधारे त्यांनी भारतीय पारपत्र मिळविले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.

चौकशीत अली यांनी पोलिसांनी सांगितले, की आपल्या वडिलांची आणि आपली कागदपत्रे वापरून आपण भारतीय पारपत्र मिळवले आहे. त्याची मुदत ऑक्टोबर २०१९ पर्यंत होती. या पारपत्राच्या आधारे चाँद अली पाकिस्तानात आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. भारतीय पारपत्रात दिलेल्या अटीप्रमाणे चाँद यांनी त्याच पारपत्राच्या आधारे भारतात परत येणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता आपण पाकिस्तानी नागरिक असल्याची कागदपत्रे बनवून त्या आधारे पाकिस्तानी पारपत्र प्राप्त करून घेतले. हे करताना भारतीय नागरिकत्व त्यांनी लपवले. पाकिस्तानी पारपत्राचा आधार घेऊन चाँद अली भारतात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

सन २००९ मध्ये चाँद यांनी भारतीय पारपत्र तयार केले असताना ती माहिती लपवून चाँद यांनी सन २०२४ मध्ये पारपत्र कार्यालयाकडे नव्याने पारपत्र मिळविण्यासाठी अर्ज केला. आणि भारतीय नागरिकत्व असलेले जानेवारी २०२५ ते २०३५ या कालावधीतील पारपत्र प्राप्त केले. भारतीय पारपत्राच्या आधारे पाकिस्तानात जाणे. त्याच पारपत्रावर पुन्हा भारतात येणे अपेक्षित असताना तसे न करता पाकिस्तानी पारपत्रावर भारतात येऊन भारतीय नागरिकत्व चाँद अली यांनी लपवून ठेवले. सन २००९ मध्ये भारतीय पारपत्र काढले असताना पुन्हा सन २०२४ मध्ये नव्याने गैरकायदेशीररित्या भारतीय पारपत्र प्राप्त केले. त्यामुळे आपली चाँद अली यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३३६, ३३९ आणि ३४० कलमान्वये, सह पारपत्र अधिनियम आणि सह विदेशी अधिनियमाने तक्रार असल्याचे हवालदार वाघ यांनी तक्रारीत म्हटले आहे.