कल्याण : स्वतःच्याच अल्पवयीन मुलाची वडिलांनीच चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मार्च २०२४ मध्ये मुंबईतील सांताक्रुझ परिसरात घडली होती. यामध्ये आलोक दिनेश गुप्ता (१५) या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात आलोकचे वडील दिनेश गुप्ता (४४) याला वाकोला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली होती. याप्रकरणात सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार बोहरा यांनी या गुन्ह्याच्या तपासातील त्रुटी, सबळ पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या विसंगतीचा विचार करून या गुन्ह्यातील आरोपी वडिलांची निर्दोष मुक्तता केली.
गुन्हा घडल्यापासून आरोपी हा मुंबई येथील आर्थर रोड तुरुंगात होता. या आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीचे वकील ॲड. श्रीराम चिंदरकर यांनी बचाव पक्षाच्या बाजूने संपूर्ण खटला चालवला. बचाव पक्षाकडून एकूण सात सक्षम साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे फिर्यादी प्रीती दिनेश गुप्ता (आरोपीची मुलगी), तसेच सोनी दिनेश गुप्ता (आरोपीची पत्नी) व इतर स्वतंत्र साक्षीदार तपासण्यात आले. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे सदरचा खटला मुंबई सत्र न्यायालयाने जलद गतीने दीड वर्षांमध्ये निकालात काढला. साक्षीदारांच्या साक्षींमध्ये असलेली तफावत, तसेच साक्षीदारांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या घटना, स्वतंत्र साक्षीदारांकडून देण्यात आलेल्या साक्षीनुसार स्वतंत्र साक्षीदार हे फक्त ऐकीव साक्षीदार असल्यामुळे ते देखील सरकारी पक्षास गुन्हा सिद्ध करण्यास मदत करू शकले नाहीत. तसेच, तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये करण्यात आलेल्या गंभीर त्रुटींचा आधार घेऊन बचाव पक्षातर्फे सत्र न्यायालयात बाजू मांडण्यात आली.
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद
– बचाव पक्षातर्फे बाजू मांडताना आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, पोलीस हे मुख्य आरोपी शोधू शकत नसल्यामुळे मुलाच्या वडिलांनाच सदरच्या केसमध्ये खोट्या पद्धतीने गुन्ह्यात अडकवले. त्याच्याविरुद्ध बनावट आरोपपत्र दाखल केली.
– सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे तसेच आरोपी हा अन्य कोणी नसून मुलाचे वडील असल्यामुळे तसेच तपासण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष विचारत घेऊन आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध होत असल्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
– दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्या नंतर सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, सर्व साक्षीदारांची साक्ष विचारात घेता व सरकारी पक्षाची व बचाव पक्षाची बाजू लक्षात घेता सरकारी पक्ष परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण करण्यास अयशस्वी ठरले.
– सरकारतर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या आधारे आरोपीला सिद्ध दोषीपर्यंत नेता येणार नाही, असे मत सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार बोहरा यांनी नोंदवले. व आरोपी दिनेश गुप्ता याची सदरच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
