कल्याण : सिमेन्स कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे सांगून कल्याण पश्चिमेतील हिराबाग भागात राहत असलेल्या बेरोजगाराला तीन भामट्यांनी १२ लाख ६७ हजार रुपयांची फसवल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशाल प्रमोद धुरू (वय ५५) असे फसवणूक झालेल्या रहिवाशाचे नाव आहे.

पोलीस तक्रारीतील नोंदीनुसार, विशाल धुरू एका खासगी कंपनीत अंधेरी येथे नोकरीला होते. काही कारणाने ते काम त्यांनी सोडले. ते नोकरीच्या शोधात होते. समाजमाध्यमांवर ऑनलाइन माध्यमातून दिसणारी नोकरी देणारी ॲप ते नियमित तपासत होते. एका ॲपवर माहिती शोधत असताना पायल शर्मा नावाच्या महिलेने तक्रारदार विशाल यांना संपर्क केला. त्यांना आपण नोकरीच्या शोधात आहात, सिमेन्स कंपनीत नोकरीसाठी जागा उपलब्ध आहेत. तेथे आम्ही तुमचे काम करू देऊ शकतो, असे आश्वासन दिले.

सिमेन्स कंपनीत काम मिळणार असल्याने शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याची तयारी धुरू यांनी केली. दोन दिवसांनी धुरू यांना अनुज कुमार नावाच्या व्यक्तीने संपर्क केला. आपण सिमेन्स कंपनीत रिलेशनशिप मॅनेजर आहोत, असे त्यांनी सांगितले. आपली दोन दिवसांत ऑनलाइन मुलाखत घेतली जाईल. आपणास प्रथम प्रमाणित व्यवस्थापन सल्लागाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी तातडीने ९९ हजार रुपये भरण्यास धुरू यांना सांगण्यात आले. त्यानंतर धुरू यांनी तात्काळ ऑनलाइन माध्यमातून ९९ हजार रुपये भरले.

आपणास सिमेन्स कंपनीकडून पद स्थापनेसाठी ईमेल आला. आपणास पुढील कामासाठी अडीच लाख रुपये भरण्यासाठी तगादा लावण्यात आला. आपण ती रक्कम अनुज यांनी दिलेल्या बँक खात्यावर वर्ग केली. त्यानंतर उर्वरित रक्कम भरण्यासाठी अनुज कुमार आपणास सतत फोन करू लागला. आपण १२ लाख ६७ हजाराची रक्कम फेब्रुवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीत टप्प्याने भरणा केली. रक्कम पूर्ण केल्यानंतर धुरू पायल शर्मा, अनुज कुमार यांना संपर्क करू लागले. त्यावेळी त्यांचे फोन बंद येऊ लागल्याने धुरू यांच्या मनात संशय बळावला. आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे धुरू यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पायल शर्मा, अनुज कुमार, श्रीकांत वाचस्पती यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.