डोंबिवली – कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरात मागील आठवड्यात भरधाव वेगातील मर्सिडिज कारच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याप्रकरणी मर्सिडिज चालक कोमील गायकर याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.गायकर यांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. मुळ्ये यांनी या गुन्ह्याचे स्वरूप पाहून कोमिल गायकरचा जामीन अर्ज फेटाळून लावला. कल्याणमधील एका नर्सरीत काम करणारा सुनील कोळी (२५) २१ ऑक्टोबर रोजी पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडला होता.

कल्याण पश्चिमेतील निक्कीनगर परिसरातील रस्त्यावरून पायी जात असताना मागून आलेल्या भरधाव मर्सिडीज कारने धडक दिली. या धडकेत सुनील कोळी १५ ते २० फूट फेकला गेला.

रस्त्यालगत असलेल्या एका स्वागत कमानीत अडकला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. काही पादचाऱ्यांनी ही माहिती तत्काळ पोलिसांना दिली. या घटनेनंतर मर्सिडिज चालक कोमिल गायकर आपल्या वाहनासह पळून गेला. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी कारचालक कोमील गायकर (२३) याला अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याची रवानगी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात करण्यात आली. आरोपीने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

विधानसभा सदस्य स्टिकरचा शोध सुरू

या प्रकरणात आरोपीच्या मर्सिडीज कारवर विधानसभा सदस्य असल्याचे दर्शविणारे स्टिकर असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात मांडली. सुनावणी दरम्यान आरोपीचे वडील आमदार आहेत का, अशी विचारणा न्यायालयाने केल्याचे उपस्थितांनी सांगितले. आरोपीचे वडील आमदार नसून व्यावसायिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने आरोपी कोमिल गायकर याला तूर्तास न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. या वाहनावर विधानसभा सदस्य असल्याचे स्टिकर का लावण्यात आले होते. ते कोठुन मिळविण्यात आले या दिशेने पोलीस तपास करत आहेत.