कल्याण – आम्ही तुम्हाला मद्य वितरणाची एजन्सी आणि मद्य वितरणाचा परवाना देतो असे सांगून पुणे, अहिल्यानगर भागातील दोन इसम आणि एक तक्रारदाराचा जावई अशा तीन जणांनी संगनमत करून कल्याणमधील एका व्यापाऱ्याची ३० लाख रूपयांची फसवणूक केली आहे. मागील पाच वर्षापूर्वी हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या फसवणूक प्रकरणी कल्याणमधील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाजीपाला, फळविक्री व्यापाऱ्याने शुक्रवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कल्याणमधील फसवणूक झालेले व्यापारी सदाशिव टाकळकर (६५) यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी पवन दशरथ हगवणे (रा. गिरवली, आंबेगाव, जि. पुणे), शरद रामभाऊ गायकवाड (रा. श्रीरामपूर, नर्सरी, अहिल्यानगर), तक्रारदार टाकळकर यांचे जावई महेंद्र पिराजी खिलारे (ता. शिरवली, आंबेगाव) यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४६५, ६७ अशा अनेक कलमाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सदाशिव टाकळकर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की पवन हगवणे, शरद गायकवाड आणि महेंद्र खिलारे यांनी आपणास ठाणे जिल्ह्यासाठी नॅचरल हर्बल बिअर आणि नॅचरल हर्बल व्हिस्की या कंपनीची वितरण एजन्सी आणि मद्य वितरण परवाना देतो असे आमिष दाखवले. महेंद्र खिलारे हे आपले जावई आहेत. सन २०२१ मध्ये जावई महेंद्र यांनी आपली ओळख गायकवाड, हगवडे यांच्यासोबत करून दिली होती. पाच वर्षापूर्वी जावई महेंद्र त्यांचे मित्र पवन हगवणे हे कल्याण बाजार समितीमधील आपल्या व्यावसायिक गाळ्यात आले होते.

त्यावेळी हगवणे यांनी आपणास आमची पुणे एरवंडणे येथे हर्बाेहोल डिस्टलिरिज नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही नॅचरल हर्बल बिअर, व्हिस्कीची विक्रीचे उत्पादन आणि विक्री करतो. आम्ही कंपनीचे संचालक आहेत. असे सांगून हगवणे यांनी गायकवाड यांच्याशी बोलणे करून दिले. आम्ही तुम्हाला ठाणे जिल्ह्यासाठी आमच्या मद्य विक्रीची एजन्सी आणि मद्य वितरण परवाना देतो असे आमिष दाखवले.

करोना काळात आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे आपल्या व्यवसायाला जोड म्हणून टाकळकर यांनी जावयावर विश्वास ठेऊन ही एजन्सी घेण्याचे ठरवले. मद्यविषयक काही माहिती टाकळकर यांना हगवणे यांनी दाखवली. एजन्सी आणि मद्य विक्री परवान्यासाठी ३० लाख रूपये द्यावे लागतील असे तक्रारदाराला सांगण्यात आले. जावई मध्यस्ठी असल्याने आपली फसवणूक होणार नाही असा विचार करून तक्रारदार टाळकर यांनी हगवणे, गायकवाड यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन माध्यमातून टप्प्याने एकूण ३० लाख रूपये पाठवले.

बराच कालावधी उलटल्यावर टाकळकर आपले जावई खिलारे यांना एजन्सी, परवान्याबाबत विचारणा करत होते. त्यावेळी खिलारे आपले काम होईल असे आश्वासन देत होते. तक्रारदाराने हगवणे, गायकवाड यांना संपर्क करून आपले काम लवकर करा. तसे होत नसेल तर पैसे परत करा.

तुमच्याकडून काम होईल असे वाटत नाही, असा संशय व्यक्त केला. त्यावरून हगवणे, गायकवाड यांनी टाकळकर यांना शिवीगाळ करत पुन्हा याविषयी फोन न करण्याची तंबी देऊन ठार मारण्याची धमकी दिली. मद्य एजन्सी देण्याचे दाखवून तीन इसमांनी आपली आर्थिक फसवणूक केली म्हणून टाकळकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. उपनिरीक्षक निसार तडवी तपास करत आहेत.