कल्याण : कल्याण पूर्वेत दुचाकीवरून प्रवास करत असताना बुधवारी मेट्रो कामाच्या ठिकाणची एक वजनदार लोखंडी सळईचा तुकडा डोक्यात पडून एका प्रवासी गंभीर जखमी झाला. या तरूणावर फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मेट्रोच्या कामाचा भोंगळपणा उघड झाला असून या कामाच्या ठिकाणी प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई, ठाणे मेट्रो मार्गावर मेट्रो कामाच्या ठिकाणी यापूर्वी ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. या दुर्घटनेत प्रवासी जखमी झाले आहेत. या घटना सुरू असतानाच, बुधवारी कल्याण पूर्वेत मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अब्दुल हक हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अब्दुल हक हे आपला मित्र हितांशु यांच्या मोटार सायकलवरून कल्याण पूर्व भागातून उल्हासनगर दिशेने चालले होते. मेट्रो काम सुरू असलेल्या ठिकाणाहून हे दोघे जात असताना अचानक हितांशु यांच्या पाठीमागे मोटार सायकलवर बसलेल्या अब्दुल हक यांच्या डोक्यात मेट्रो कामाच्या ठिकाणची एक लोखंडी सळईचा तुकडा वेगाने डोक्यात पडला. हक यांना दुचाकीवरच भोवळ येऊन त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. हक यांना तातडीने कल्याण पूर्वेतील मिरा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. तेथे आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. हक यांना अधिक उपचाराची गरज असल्याने त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

स्थानिकांमध्ये भीती; आंदोलनाचा इशारा

या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणाहून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. अशाप्रकारे मेट्रो कामातील सिमेंटच्या स्लॅबचा तुकडा, कामाच्या ठिकाणची लोखंडी सळई किंवा इतर बांधिव साहित्य वरून जमिनीवर पडले आणि त्याचा फटका पादचाऱ्यांना बसतो. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून तत्काळ उपाययोजना न राबवल्यास या कामाच्या ठेकेदाराविरूध्द मोठा उठाव होऊ शकतो, असा इशारा स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांनी वर्तवली.

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

कल्याणमध्ये अतिशय वर्दळीच्या जागेत मेट्रो मार्ग १२ ची कामे सुूरू आहेत. या कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक संरक्षित जाळ्या, सुरक्षेची साधने उभी करून मगच ही कामे करावीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी धोकादायक स्थितीत एखादी वस्तू राहणार नाही याची काळजी ठेकेदार कंपनीने घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. अब्दुल हक यांना झालेल्या अपघात प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासन, पोलिसांनी याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांडून जोर धरू लागली आहे.