scorecardresearch

नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

इंग्रजी शाळेत शिकणारा आपला मुलगा शाळेत, खासगी शिकवणीत जात नाही म्हणून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे.

Kalyan child sexually abused
नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : गेल्या चार वर्षांच्या काळात नाशिक येथील एका ३२ वर्षांच्या महिलने कल्याण पूर्वेतील एका १५ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करून त्याला दारूचे व्यसन, अश्लील चित्रफिती बघण्याचे व्यसन लावले आहे. इंग्रजी शाळेत शिकणारा आपला मुलगा शाळेत, खासगी शिकवणीत जात नाही म्हणून मुलाच्या आईने मुलाला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीला आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी नाशिक येथील ३२ वर्षांच्या (कुटुंब असलेल्या) महिलेविरुद्ध सोमवारी पहाटे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले, अल्पवयीन मुलाचे वडील कल्याण डोंबिवली पालिकेत नोकरी करतात. पीडित मुलाची आई गृहिणी, घरात बहिणी, आजी आहे. पीडित मुलाची आत्या नाशिक येथे कुटुंबासह राहते. तिची तेथे एक मानलेली मुलगी आहे. ती ३२ वर्षांची आहे. तिला दोन मुले आहेत. आईला पाहण्यासाठी नणंद कल्याणला आली की तिच्यासोबत तिची ३२ वर्षांची मानलेली मुलगी कल्याणला पीडित मुलाच्या घरी येत होती. यामधून पीडित मुलगा आणि मानलेली मुलगी यांच्यात ओळख झाली. पीडित मुलगा नाशिक येथे आत्याकडे नियमित जाऊ लागला. तीन महिने राहू लागला. मानलेली मुलगी कल्याणला आली की नणंद, मानलेल्या मुलीची मुले, पीडित मुलगा मुंबई येथे फिरण्यास जात होते. यामधून पीडित मुलगा आणि आरोपी महिला (मानलेली मुलगी) यांच्यात नियमित बोलणे सुरू असायचे. या संवादातून आरोपी महिला आणि पीडित मुलगा यांच्यात शारीरिक संबंध तयार झाले. कल्याणमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकणारा मुलगा नियमित शाळेकडे पाठ फिरवून नाशिकला जाऊन राहू लागला. त्याला विरोध केला की तो रागवायचा. नाशिकला रागातून निघून जायचा. २०१९ पासून हा प्रकार सुरू होता.

हेही वाचा – “असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर”, एकनाथ खडसेंची टीका

आरोपी महिलेने पीडित मुलाला तिच्याशी संभाषण करण्यासाठी, अश्लील चित्रफिती बघण्यासाठी एक मोबाईल खरेदी करून दिला होता. आईने मुलाला मोबाईलची विचारणा केली तर त्याने नाशिकच्या आरोपी महिलेने घेऊन दिला असे सांगितले. आईचा त्यामुळे संशय बळावला. आईने मुलाच्या खासगी शिकवणीतील शिक्षकाला मुलाला विश्वासात घेऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी पीडित मुलाने आपले नाशिक येथील एका महिलेशी संबंध असल्याचे, आपणास अश्लील चित्रफिती पाहण्याची सवय लागल्याची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखविले. त्यात फरक पडला नाही. मुलगा दारू पिऊ लागला. दारूसाठी पैसे आपण भोजनखान्यात काम करतो त्यामधून पितो, असे मुलगा सांगू लागला. २० हजार रुपयांचा मोबाईल आरोपी महिलेने पीडित मुलाला घेऊन दिला होता.

हेही वाचा – डोंबिवलीत बेकायदा इमारती बांधणाऱ्या ११ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे; ह, फ प्रभागाची आक्रमक कारवाई

मुलाचे मोबाईल काढून घेतले की तो आई, आजीच्या मोबाईलवरून आरोपी महिलेशी संपर्क करत होता. त्याचे मोबाईल काढून घेतले तर तो रागाने नाशिक येथे आरोपी महिलेच्या घरी जात होता. मुलगा व्यसनी बनून फुकट चालला आहे म्हणून कुटुंबीयांना त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात भरती केले. शासनाच्या बालहक्क सुधार विभागाकडून मुलाला समुपदेशन करण्यात येऊ लागले. आरोपी महिलेमुळे आपल्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याला विविध व्यसने लावून फुकट घालविले म्हणून मुलाच्या आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी नाशिकच्या महिलेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:15 IST