Kalyan School Girls Missing Update: कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ला परिसरातील एका शाळेतील चार मुली शाळा सुटल्यानंतर दोन दिवसापूर्वी बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होताच, कल्याणच्या पोलिसांनी चार विशेष पथके तयार करून या मुलींचा शोध सुरू केला. या चारही मुली राजस्थानातील मारवाड रेल्वे स्थानकात सापडल्या असल्याची माहिती कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी दिली.

गेल्या वर्षापासून कल्याण, डोंबिवली शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुले बेपत्ता होण्याप्रकरणी कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. वय वर्ष १३ ते १७ पर्यंतची मुले, मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुले घराच्या परिसरात खेळत असताना, झोपेतून उठून निघून गेली आहेत, काही मुले शाळेत जातो, शिकवणीला जातो सांगून घरातून निघून गेली, ती पुन्हा घरी परतली नाहीत. कल्याण शहर परिसरात अचानक अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुली बेपत्ता

कल्याण पश्चिमेतील दु्र्गाडी किल्ला परिसरात एक शाळा आहे. या शाळेतील चार मुली दोन दिवसापूर्वी शाळा सुटल्यानंतर घरी गेल्या नाहीत. यामधील दोन मुली या १३ वर्षाच्या आहेत. त्या इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहेत. दोन मुली या १४ वर्षाच्या आहेत. त्या इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे या मुली घरून शाळेत आल्या. शाळा सुटल्यानंतर त्या घरी गेल्या नाहीत. खूप उशीर झाला तरी आपली आपली मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी या मुलींच्या मैत्रिणींकडे विचारणा केली. त्यांनी मुली घरी गेल्याचे सांगितले.

शाळेत विचारणा केल्यावर मुली शाळेत होत्या. शाळा सुटल्यावर त्या घरी गेल्याचे सांगण्यात आले. शाळा, शहर परिसरात शोधुनही या मुली सापडल्या नाहीत, त्यामुळे या मुलींच्या पालकांनी बाजारपठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना बाजारपेठ, महात्मा फुले पोलीस ठाण्याची चार पथके तयार करून या मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

पोलीस पथकांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या या मुलींचा विविध भागात सुरू केला. या मुलींचा शोध घेत असताना या चार मुली कल्याण रेल्वे स्थानकातून राजस्थान चालल्या असल्याची माहिती कल्याण पोलिसांना रेल्वे सुरक्षा बळाकडून मिळाली. तपास पथकाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका हस्ते यांनी राजस्थान मारवाड येथे जाऊन तेथील रेल्वे सुरक्षा बळाकडून या मुलींचा ताबा घेतला, असे साहाय्यक पोलीस आयुक्त होनमाने यांनी सांगितले.

या मुलींना कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत कसे आणि कोणी नेले. या मुलींनी राजस्थापनपर्यंतचा प्रवास कोणा सोबत केला यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.