महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिका तसेच मशिदी आणि मदशांवर धाडी टाकण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यांवरील नाराजीमुळे कल्याणमधील मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी राजीनामा दिलाय. गुरूवारी मनसेच्या सदस्यत्व आणि प्रदेश सचिव पदाचा राजीनामा इरफान यांनी पक्षाकडे सुपूर्द केला आहे. काही दिवसांपूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. या इशाऱ्यावरून शेख नाराज झाले होते. तशी नाराजी त्यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत राज यांनी भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिल्याने या गुंत्यात अडकणे नको असा विचार करून शेख यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा मार्ग पत्करला आहे. पक्ष सोडण्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

नक्की वाचा >> “…आणि डोळ्यात पाणी आलं”; राज ठाकरेंच्या नव्या राजकीय भूमिकेनंतर मनसेच्या मुस्लीम नेत्याची भावनिक पोस्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहेत इरफान शेख?
शेख यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पाठवून दिला. पक्षाच्या कल्याण जिल्हा, राज्य पातळीवरील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पाडल्या. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत मनसेला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात शेख यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मनसेच्या अनेक आंदोलनात अग्रभागी राहून अनेक गुन्हे अंगावर घेतले. न्यायालयात फेऱ्या मारल्या. मराठी पाट्या आंदोलनात पोलिसांचा सुज येईपर्यंत मार खाल्ला. पक्षासाठी कधी हे दुख: जाहीर केले नाही, अशी खंत शेख व्यक्त करतात. मात्र त्यांनी फेसबुकवरही पक्षाचा राजीनामा देणारं पत्र तसेच एक भावनिक संदेश लिहिला आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: …अन् वसंत मोरे राज ठाकरेंच्या पाया पडले; ‘शिवतीर्थ’वरील बैठकीमधील Inside Photos पाहिलेत का?

आणि स्वतः पक्षाध्यक्षच…
“आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’..!”, या मथळ्याखाली इरफान यांनी फेसबुकवर राजीनाम्याची पोस्ट लिहिलीय. “खरं तर कधी अशी परिस्थिती समोर येईल असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या पक्षात काम करतो, ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो तोच पक्ष जर आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाच्या विरोधात द्वेषात्मक भूमिका घेत असेल आणि स्वतः पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर नक्कीच पक्षाला शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची वेळ आली आहे,” असं स्पष्ट मत रोखठोकपणे इरफान शेख यांनी मांडलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

राज ठाकरे म्हणजे…
“ब्लु प्रिंट, विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मशिदींवरील भोंगे आणि मदरश्यांवर येऊन थांबतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येऊन जातं,” असंही इरफान यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “पक्ष स्थापन झाला तेव्हा भूमिका होती की जातीपाती विरहित राजकारण करायचं. म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत आणि जीवतोड मेहनत देखील करत आहेत. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता. राज ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते मात्र पाडव्याच्या सभेत वेगळंच काहीतरी पाहायला आणि ऐकायला भेटलं,” अशी खंतही इरफान यांनी पोस्टमधून व्यक्त केलीय.

नक्की वाचा >> भोंगा प्रकरणावरील मतभेदांनंतर वसंत मोरेंना ‘शीवतीर्थ’वर पाहताच राज ठाकरेंनी उच्चारले ‘ते’ तीन शब्द; मोरेंनीच केला खुलासा

माझ्यासोबत चला मी दाखवतो मदरसे…
“म्हणे मदरश्यांवर छापे मारा पाहा काय काय मिळतं! राजसाहेब, कित्येक गोरगरीबांच्या मुलांचे मदरश्यात शिक्षण होते. तिथे कधीच काही चुकीचं होत नाही. नसेल तर माझ्यासोबत चला मी दाखवतो मदरसे. मात्र बदनामी का?”, असा प्रश्न इरफान शेख यांनी विचारलाय.

असल्या राजकारणाची गरज का पडली?
“मुस्लीम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं त्यांना मशिदींच्या भोंग्यांपासून त्रास होतो. मदरश्यांना बदमान करायचं काम त्यांचं आहे.अशा शक्तींच्यामागे आपल्याला जायची गरजच का आली? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली?,” असा प्रश्न इरफान शेख यांनी उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर

त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
“मी ही एक राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रातील मराठी मुसलमान आहे. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे. त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारखं आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे,” असं पोस्टच्या शेवटी इरफान यांनी म्हटलंय. “राज साहेबांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा ‘जय महाराष्ट्र'”, असं म्हणत पोस्टचा शेवट केलाय.

काही दिवसापूर्वी त्यांनी भावनिक होऊन एक मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ‘आमच्या भावना कठे व्यक्त करायच्या. आता समाजाला सामोरे कसे जायाचे? १६ वर्षाचा मागील इतिहास आठवला आणि डोळ्यात पाणी आले’, या भावनिक मजकुराची सोशल मीडियावर खूप चर्चा होती. नाराज होऊनही वसंत मोरे यांच्यासारखी भेट राज यांनी शेख यांना दिली नव्हती किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नव्हता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan mns leader irfan shaikh resign from mns fb post slamming raj thackeray goes viral scsg
First published on: 14-04-2022 at 20:30 IST