कल्याण – वाढदिवसाचा केक कापण्यावरून झालेल्या वादविवादातून मोहने येथील अभ्या गुंडाने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने एका कंपनी कामगारावर रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान गोळीबार केला. हा कामगार गोळीचा नेम चुकल्याने थोडक्यात बचावला. या कामगाराच्या भावालाही अभ्या गुंडाने मारण्याचा प्रयत्न केला पण तोही त्यांच्या तावडीतून निसटल्याने बचावला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनु शंकर फुलारी (२१) असे गोळीबार झालेल्या कंपनी कामगाराचे नाव आहे. ते अटाळी गावात कुटुंबीयांसह राहतात. ते शहाड येथील सेंच्युरी रेयाॅन कंपनीत कामगार म्हणून काम करतात. त्यांना ज्ञानेश्वर (१८) भाऊ आहे. मोनू फुलारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहने लहुजीनगर भागातील अभिषेक प्रकाश पवार उर्फ अभ्या, अमोल देवरे, सोहेल तांबोळी, विजय भुतकर, समीर वाघमारे, प्रणय डोळस आणि इतर आठ अज्ञात तरूणांविरूध्द शस्त्र प्रतिबंधक, भारतीय न्याय संहिता कायद्याने गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनू फुलारी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सोन्या साळुंखे याचा गेल्या महिन्यात वाढदिवस होता. या वाढदिवसाचा केक कापण्यावरून माझा आणि अभिषेक पवार उर्फ अभ्या यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अभ्याने आपणस लहुजीनगर भागात साथीदारांच्या साहाय्याने मारहाण केली होती. या मारहाणीची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. याप्रकरणी आपण खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
गेल्या आठवड्यात आपण वडवली गावातील पाटीलनगर तुलसी वाटिका इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान मोबाईलमधील चित्रफिती पाहत होतो. माझ्यापासून काही अंतरावर माझा भाऊ ज्ञानेश्वर उभा होता. काही वेळाने माझ्या दिशेने अमोल देवरे, साहिल तांबोळी मोटारीतून येत होते. साहिलने आपली मोटार माझ्या समोरून पुढे नेली. काही वेळाने मी उभा असलेल्या भागात झाडाझुडपांतून अभ्या, अमोल देवरे, सोहेल तांबोळी, विजय भुतकर, समीर वाघमारे, प्रणय डोळस माझ्या दिशेने धावत येत होते. अभ्या पवारच्या हातात बंदूक होती. तो सर्वांच्या पुढे होता.
अमोल देवरे मोन्याला पकडा म्हणून मोठ्याने ओरडत धावत होता. हे सर्व जण आपल्याला मारतील असा विचार करून मी पळू लागलो. तेवढ्यात अभ्याने स्वता जवळील बंदुकीतून माझ्या दिशेने गोळी झाडली. गोळी मी थोडक्यात हुकवली आणि वाचलो. मी जीव वाचविण्यासाठी वडवली बाजुच्या झाडाझुडपात लपून बसलो. अभ्या आणि टोळी माझा काही अंतर पाठलाग करून ते मागे फिरले.
ते नंतर माझा भाऊ ज्ञानेश्वर उभा असलेल्या ठिकाणी पळाले, पण ज्ञानेश्वरने त्यांना हुलकावणी देऊन तो तुलसी वाटिका दिशेने पळून गेला. तोही त्यांच्या तावडीत सापडला नाही. नंतर अभ्या आणि त्याचे १४ साथीदार मोकळ्या मैदानात जमा झाले. तेथे अभ्याने स्वताच्या हातामधील बंदुकीतून स्वताच्या दंडावर गोळी झाडून घेतली. तेथून ते सर्व जण बेडा रोडकडे निघून गेले.
आपण भाऊ ज्ञानेश्वराला मोबाईलवरून संपर्क केला. तोही वडवलीच्या जंगलात लपून बसला होता. तो या टोळीचा डोळा चुकवून घरी गेला. तेथून दुचाकी आणली. आणि मग आम्ही खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झालो. तोपर्यंत अभ्याची टोळी तेथून निघून गेली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
