कल्याण – कल्याण जवळील मोहने गावातील प्रसिध्द रील स्टार प्रेम सोहन भाटी (३१) यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्रेमच्या भावाच्या तक्रारीवरून या मृत्युला जबाबदार मोहने भागातील कल्याण डोंबिवली पालिकेचे गटार दुरुस्ती ठेकेदारासह ५ जणांवर रविवारी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.मयत प्रेम भाटीचा भाऊ जितू सोहन भाटी (२९) याने या अपघाती मृत्यूप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी मोहने भागात मोहने एनआरसी प्रवेशव्दारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर गटार दुरुस्तीचे काम करणारे कल्याण डोंबिवली पालिकेचे ठेकेदार मे. अलका मजुर कामगार संस्थेचे मालक निक्की मोटवानी (रा. उल्हासनगर), उप ठेकेदार महेश काळुराम भोईर (रा. वाडेघरपाडा, कल्याण), धनेश श्रीपत पाटील (रा. सापाड गाव, कल्याण), पर्यवेक्षक दीपक महेंद्रप्रताप पांडे (रा. आंबिवली) आणि इतर यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या ३१२,१०६(१), १२५(अ, ब), २८५, ३(५) अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
गटार दुरुस्तीने अपघात
मोहने एनआरसी प्रवेशव्दाराच्या समोरील भागात सार्वजनिक रस्त्यावर गटार दुरुस्तीचे काम कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदारांकडून सुरू आहे. या गटाराच्या कामासाठी आणलेली खडी रस्त्याच्या एका बाजुला वाहतुकीला, प्रवाशांना त्रासदायक ठरणार नाही अशा पध्दतीने साठवण करून ठेवणे हे ठेकेदाराचे काम होते. ठेकेदाराने खडीचा ढीग रस्त्याच्या बाजुला वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने साठवण करून ठेवला. हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा असल्याने या खडीच्या ढिगाच्या काही भागावरून सतत वाहने जाऊन खडीचा काही भाग रस्त्यावर पसरला होता. बारीक खडी रस्त्यावर पसरल्याने वाहने या खडीवरून घसरत होती. त्याचा सर्वाधिक फटका दुचाकी चालकांना बसत होता.
प्रेमची दुचाकी घसरली
मोहने गावात राहणारे प्रेम भाटी आपल्या पत्नीला माहेरी सोडविण्यासाठी शुक्रवारी कल्याण पश्चिमेतील योगीधाम भागात आपल्या दुचाकीवरून गेले होते. तेथे रात्रीचे भोजन करून ते दुचाकीवरून मोहने येथील शिवनगरी संकुलातील घरी परतत होते. प्रेमला घरी येण्यास उशीर होत असल्याने वडिलांनी प्रेमला फोन करून घरी लवकर येण्याचे सूचित केले होते. आपण दहा मिनिटात पोहचतो असे प्रेमने वडिलांना सांगितले होते.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रेम आपल्या दुचाकीवरून मोहने एनआरसी प्रवेशव्दारासमोरून जात असताना त्यांची दुचाकी प्रवेशव्दारासमोरील गटार दुरुस्ती ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या खडीवरून घसरली. दुचाकी वेगात असल्याने प्रेम दुचाकीसह खडीवरून घसरत काही अंतर गेला. त्याच्या डोक्याला, हात, पायाला गंभीर दुखापत झाली. आजुबाजुच्या नागरिक, काही वाहन चालकांनी प्रेमला साहाय्य केले. तो बेशुध्दावस्थेत होता. त्याच्या कुटुबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली.
त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक एम. एस. आंधळे, शितल बामणे, उपनिरीक्षक ए. पी. दांडेगावकर यांनी घटनास्थळी देऊन पाहणी केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. बाकले याप्रकरणाचा तपास करत आहेत.
