कल्याण – कर्करोग मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी रविवारी शहरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत कल्याण शहर परिसरातील सुमारे दीड हजार नागरिक सहभागी झाले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ, दिव्यांग पावसाचा आनंद घेत या स्पर्धेत सहभागी होऊन कर्करोग मुक्त कल्याण शहराचा संदेश शहरवासियांना देत होते. इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर फाऊंडेशन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ”कर्करोगमुक्त कल्याण” मान्सून मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य जनजागृतीचा अनोखा संदेश दिला. कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील निसर्गरम्य वर्तुळकार रस्त्यावर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या मान्सून मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. भर पावसातही सहभागींचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

कर्करोग विरोधातील लढा ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची चळवळ आहे, असा संदेश या पावसाळी धावण्याच्या स्पर्धेतून देण्यात आला. यावेळी इंडियन कॅन्सर डे केअर ट्रीटमेंट सेंटरचे प्रमुख कर्करोग तज्ज्ञ डॉ. अमित घाणेकर यांनी सांगितले की, आजच्या घडीला कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मात्र अनेक रुग्ण वेळेवर तपासणी आणि उपचार न घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनते. त्यामुळे नागरिकांमध्ये कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण व्हावी, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटावे आणि वेळेत उपचार घेण्याची सवय लागावी, या उद्देशाने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच या मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी हा आय. सी. टी. सी. फाऊंडेशनमार्फत गरजू कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त कार्यालय, शहरातील प्रमुख महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक व्यावसायिक, उद्योजकांनी मोलाचे सहकार्य केले. ३, ५ आणि १० किलोमीटर अशा तीन गटांमध्ये पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये दीड हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल, विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, उद्योजक मच्छिंद्र जाधव, विमल ठक्कर, ‘आयसीटीसी’ कल्याणचे डॉ. अमित घाणेकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

“पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत आरोग्याचा संदेशही शहरभर पोहोचला आणि ”कॅन्सरमुक्त कल्याण”च्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले, ” अशी भावना यावेळी अनेक सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.