कल्याण : येथील पश्चिमेतील ब प्रभागातील रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे घनकचरा विभागाचे स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांना आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीला ४८ तासात उत्तर देण्याची तंबी नोटिसीत देण्यात आली आहे. या कारवाईमुळे इतर प्रभागांमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कचरामुक्त कल्याण, डोंबिवली शहरे करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्वच्छता हा पालिके बरोबर नागरिकांच्याही सहभागाचा विषय आहे. हेही नागरिकांना पटवून देण्यासाठी पालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड उद्याने, बगिचे, सार्वजनिक ठिकाणी सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधून आपल्या प्रभागात स्वच्छता होते की नाही. पालिका स्वच्छता अधिकारी, कामगार आपल्या प्रभागात वेळेवर येतात की नाही. आपल्या प्रभागातील कचरा नियमित उचलला जातो की नाही याविषयीची माहिती घेत आहेत. यावेळी नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारीची गंभीर दखल आयुक्त डाॅ. जाखड घेत आहेत.

हेही वाचा : देशाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नकाशावर आता अंबरनाथही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरू

आयुक्त डाॅ. जाखड कल्याण पश्चिमेतील रोझाली सोसायटी परिसरातील उद्यानात स्वच्छतेच्या विषयावर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेल्या आठवड्यात आल्या होत्या. यावेळी उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त संजय जाधव उपस्थित होते. उद्यानात आलेल्या झुलेलाल चौक, गोदरेज हिल परिसरातील नागरिकांशी आयुक्तांनी संवाद झाला. नागरिकांनी आपल्या भागात नियमित गटार, रस्ते, चौक सफाई होत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे केल्या. कचऱ्या विषयी पालिकेच्या ब प्रभागात तक्रारी केल्या तर त्याचीही दखल घेतली जात नाही. कचरा एकाच जागी अनेक दिवस साठून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. या तक्रारी ऐकून आयुक्त डाॅ. जाखड संतप्त झाल्या.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी हॉटेल, इमारतींची पोलिसांकडून तपासणी; सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

ब प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांची आहे. ते आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नसल्याने ब प्रभागात गुणवत्तापूर्ण स्वच्छता होत नसल्याचा निष्कर्ष काढत आयुक्तांनी स्वच्छता अधिकारी मांजरेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. येत्या ४८ तासाच्या आत या नोटिसीला मांजरेकर यांनी उत्तर दिले नाहीतर त्यांना काहीही म्हणायचे नाही असे समजून त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियमाने कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे. घनकचरा विभागातून अन्य विभागात वरिष्ठ पदावर जाण्यासाठी मांजरेकर प्रयत्नशील असल्याची जोरदार चर्चा पालिकेत आहे.

Story img Loader