Thane Ghodbunder Road Update: कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावरील रायते परिसरात ओम्नी कार आणि सिमेंट मिक्सर यांच्यात झालेल्या समोरा-समोरच्या धडकेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर ठाणे ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा आणि वाढत्या अपघातांबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ठाणे शहरातील अत्यंत वर्दळीच्या घोडबंदर परिसरातही अपघातांच्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
घोडबंदर मार्गावर मागील १६ महिन्यांत २७ जणांचा मृत्यू झाला. याची सरासरी केल्यास दर महिन्याला एक ते दोन जणांना अपघातात जीव गमवावा लागत असल्याची नोंद आहे. तर किरकोळ आणि गंभीर अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. जड-अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक, रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे.
घोडबंदर मार्ग हा मिरा भाईदंर, वसई, बोरिवली आणि गुजरातला ठाणे शहरापासून जोडतो. नवी मुंबई येथील उरण जेएनपीए आणि भिवंडी येथून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे गुजरातच्या दिशेने ये-जा करत असतात. घोडबंदर मार्गावर विकासाच्या नावाखाली मोठी गृहनिर्माण प्रकल्प उभी राहत असल्याने गृहखरेदी करणाऱ्यांचे प्रमाण या भागात वाढत असल्याचे चित्र आहे.
असे असले तरी मेट्रो निर्माण, सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडणे, मल:निस्सारण वाहिनीची कामे यामुळे येथील सेवा आणि मुख्य रस्त्यावर खोदकामे झाली आहेत. या खोदकामांमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून नागरिकांना सकाळी आणि रात्रीच्या वेळेत प्रचंड वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, येथील जड आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतुक देखील वाढली आहे.
मागील १६ महिन्यांत घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख या भागात तब्बल २७ जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच, प्रत्येक महिन्यात एक किंवा दोघांचा मृत्यू ठरलेला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक दुचाकी चालक आणि पादचारी आहेत. ट्रक, टेम्पो, कंटेनर यांच्या चाकाखाली येऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
अपघातप्रवण क्षेत्र – काही वर्षांपूर्वी ठाणे प्रादेशिक परिहवन विभाग आणि ठाणे पोलिसांनी अपघात प्रवण क्षेत्रांची घोषणा केली होती. या अपघातप्रवण क्षेत्रामध्ये घोडबंदर मार्गावरील जवळपास सर्वच चौक अपघातप्रवण घोषित झाले होते. त्यामुळे घोडबंदर मार्ग मृत्यूचे केंद्र ठरते का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
१ जानेवारी ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत घोडबंदर मार्गावर एकूण ६ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत २१ जणांना अपघातात जीव गमवावा लागला.
