बदलापूरः कल्याण मुरबाड मार्गावर एप्रिल महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरील राज्य परिवहन विभागाच्या सेवेची मर्यादा उघड झाली. बस फेऱ्या कमी असल्याने प्रवासी खासगी वाहतुकीचा पर्याय निवडतात. त्यामुळे मुरबाडहून अधिकच्या बस फेऱ्या वाढवण्यासाठी आणि केडीएमटी, युएमटीसारख्या महापालिकांच्या परिवहन सेवा मुरबाडपर्यंत मिळण्यासाठी मुरबाडमधील तरूण, समाज माध्यमांवरील एन्फ्लुएन्सर यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र मुरबाडकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी त्यांना नियमांचे अडथळे पार करावे लागत आहेत. पालिकांच्या परिवहन सेवांची सेवा देण्याची इच्छा असतानाही तांत्रिक बाबींमध्ये मुरबाडकरांचा प्रवास अडकल्याचे समोर आले आहे.
कल्याण मुरबाड मार्गावर रायते पुलावर एप्रिल महिन्यात खासगी व्हॅनचा झालेल्या भीषण अपघातात ११ निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मार्गावर प्रवासासाठी खासगी वाहतुकीवर असलेले अवलंबित्व, राज्य परिवहन विभागाच्या मर्यादीत फेऱ्या याचे पितळ उघडे पडले होते. वेळेवर बस मिळत नसल्याने प्रवासी खासगी मात्र जीवघेणी वाहतुक निवडत असतात. त्यामुळे यावर तोडगा म्हणून राज्य परिवहन विभागाच्या फेऱ्या वाढवाव्यात, शेजारच्या कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिकेच्या परिवहन सेवा मुरबाडपर्यंत द्यावात यासाठी येथील तरूणाईने आता संघर्ष सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुरबाड विकास युवा समितीच्या माध्यमातून समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या सचिन जाधव, प्राची पाटील यांच्यासह शुभम शेट्टे या तरूणांनी प्रवाशांच्या सह्यांची मोहिम राबवण्यास सुरूवात केली आहे. त्यांना शेकडो प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो आहे. प्रवाशांची अतिरिक्त बस फेऱ्या वाढ आणि केडीएमटी, युएमटीच्या बसची सेवा सुरू करण्यासाठी आम्ही स्थानिक आमदार, खासदार, माजी खासदार अशा सर्वांना निवेदन दिले आहे, अशी माहिती सचिन जाधव यांनी दिली आहे.
तांत्रिक अडचणीत अडकली केडीएमटीची सेवा
बस फेऱ्या कमी असल्याने विद्यार्थी, नोकरदार यांना दीड ते दोन तास थांबून रहावे लागते. कार्यालयाची, महाविद्यालयाची वेळ पाळण्यासाठी खासगी वाहतुकीचाच आसरा घ्यावा लागतो. त्यासाठी आम्ही केडीएमटीची सेवा हवी म्हणून मागणी केली. मात्र मुरबाड मुंबई महानगर क्षेत्रात नसल्याने तेथे राज्य परिवहन विभाग सेवा देते. त्यांच्या ना हरकत परवानगीशिवाय केडीएमटी तांत्रिकदृष्टा सेवा देऊ शकत नाही, अशी माहिती मुरबाड विकास युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेट्टे यांनी दिली आहे. त्यासाठी आम्ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, माजी खासदार कपिल पाटील यांना निवेदन दिले आहे, असेही शुभम यांनी सांगितले.
२९० फेऱ्या आहेत कुठे
एकीकडे प्रवाशांना मुरबाड कल्याण प्रवासासाठी अनेकदा तासनतास प्रतिक्षा करावी लागते. बस फेऱ्या कमी झाल्याने लोकप्रतिनिधी सांगतात. मात्र राज्य परिवहन विभागातर्फे मात्र मुरबाड ते कल्याण दरम्यान २९० फेऱ्या सुरू असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. मात्र फक्त अंदाजे ६० फेऱ्या सुरू असतील असा प्रवाशांचा दावा आहे. त्यामुळे या २९० फेऱ्या आहेत कुठे असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.
सवलत नको, साधने उपलब्ध करा
राज्य परिवहनच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना सवलत मिळते. मात्र प्रतिक्षेचा वेळ अधिक असल्याने प्रवासी खासगी वाहनाने जातात. काही लोकप्रतिनिधी पालिकांच्या परिवहनमध्ये या सवलती मिळणार नाहीत असे सांगून परिवहन बसला नकार देत असल्याची चर्चा आहे. मात्र सवलत नको पण पर्यायी साधने उपलब्ध होऊ द्या, अशी मागणी मुरबाड विकास युवा समितीच्या वतीने केली जाते आहे.
