Kalyan Murbad Railway line land acquisition starts in 18 villages: बहुप्रतिक्षित आंबिवलीमार्गे जाणारी कल्याण मुरबाड रेल्वे मार्गिकेच्या कामाला अखेर गती मिळाली असून या कामासाठी आवश्यक जागेचे १८ गावातून जमिन संपादीत केली जाणार आहे. कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील १५१ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना नुकतीच प्रकाशीत करण्यात आली आहे. जमिन मालकांना ३० दिवसात यावर सूचना आणि हरकती नोंदवायच्या आहेत. या नव्या मार्गिकेच्या उभारणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून मागणी केली जाते आहे. कल्याण ते अहिल्यानगर असा रेल्वे मार्ग व्हावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यात कल्याण ते मुरबाड असा रेल्वे मार्ग उभारून त्याद्वारे कल्याण, मुरबाड तालुक्यातील विकासापासून दूर राहिलेल्या गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. २०१६ वर्षात तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या कल्याण – मुरबाड रेल्वे मार्गाची घोषणा केली होती.
त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समान भागिदारीतून हा मार्ग उभारेल असेही ठरले होते. सुरूवातीला उल्हासनगरातून हा मार्ग जाईल अशी चर्चा होती. मात्र पुढे कल्याणहून आंबिवली, टिटवाळामार्गे हा मार्ग उभारला जाईल यावर शिक्कामोर्तब झाले. हा मार्ग एकूण २८ किलोमीटरचा असणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी सुमारे २१४ हेक्टर जागेची आवश्यकता भासणार आहे. तर ८३६ कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे. या भूसंपादनासाठी मोठा खर्च लागणार आहे. मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मार्गासाठी निधीची घोषणा केली होती.
त्यानंतर आता या मार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरूवात झाली आहे. कल्याणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी यासाठी भूसंपादन अधिसूचना जाहीर केली आहे. कल्याण तालुक्यातील १० तर मुरबाड तालुक्यातील ८ गावांतील सुमारे १५१.४४ हेक्टर जागा यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या जमिन मालकांना जागेबाबत सूचना आणि हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूसंपादनातील गावे
कल्याण तालुक्यातील मोहने, अटाळी, आंबिवली, बल्याणी, मोहिली, रेवती, नवगाव, कोळींब, केळणी, मामनोली या गावातील ७१.८६ हेक्टर जागा संपादित केली जाणार आहे. तर मुरबाड तालुक्यातील पोटगाव, घोरले, नांदणी, पशेनी, देवपे, शास्त्रीनगर, माळीनगर, मुरबाड शहर या आठ भागातील ७९.५७ हेक्टर जागेचे संपादन केले जाणार आहे.
मुरबाडसाठी ठरणार वरदान सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळणाची प्रभावी साधने नसल्याची ओरड मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील प्रवाशांकडून सातत्याने घेतली जाते. मुरबाड तालुक्यातील प्रवासी, नोकरदार रेल्वे प्रवासासाठी बदलापूर, शहाड, कल्याण, टिटवाळा या स्थानकांवर अवलंबून असतात. मुरबाड ते बदलापूर हे अंतर ३४ किलोमीटर, शहाड रेल्वे स्थानक २९ किलोमीटर तर २५ किलोमीटर आहे. त्यामुळे या प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
